संत व सुधारकांच्या प्रबोधनातूनच अंधश्रद्धेवर प्रहार
By Admin | Updated: October 7, 2015 00:52 IST2015-10-07T00:52:55+5:302015-10-07T00:52:55+5:30
पुरोगामी महाराष्ट्रात सातशे वर्षाआधी ब्राह्मणी समाज व्यवस्थेने समाजात यज्ञ-याग उपवास-तापास, कर्मकांड, रुढी, परंपरा निर्माण करून जाती व्यवस्थेला खतपाणी घालण्याचे कार्य केले.

संत व सुधारकांच्या प्रबोधनातूनच अंधश्रद्धेवर प्रहार
श्यामसुंदर सोन्नर : ‘संतसाहित्यातून सुरू झालेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ’ विषयावर व्याख्यान
वर्धा : पुरोगामी महाराष्ट्रात सातशे वर्षाआधी ब्राह्मणी समाज व्यवस्थेने समाजात यज्ञ-याग उपवास-तापास, कर्मकांड, रुढी, परंपरा निर्माण करून जाती व्यवस्थेला खतपाणी घालण्याचे कार्य केले. यामुळे दैववादी प्रवृत्ती वाढली. या अंधश्रद्धेच्या जोखडातून, दैववादातून समाजाला सोडविण्याचे कार्य संत ज्ञानेश्वरापासून संत गाडगेबाबांपर्यंत महाराष्ट्रात जन्मलेल्या संत व समाज सुधारकांनी केली. त्यामुळे त्यांनीच खऱ्या अर्थाने प्रबोधनातून अंधश्रद्धेवर प्रहार केला, असे मत प्रवचनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज, ठाणे यांनी व्यक्त केले.
अनेकांत स्वाध्याय मंदिर येथील सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. रोटरी क्लब गांधी सिटी व अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने शामसुंदर सोन्नर महाराज यांचे संत साहित्यातून सुरू झालेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष्यस्थानी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे तर अतिथी म्हणून अनेकांत स्वाध्याय मंदिरचे सचिव अरुण चवडे, आयटकचे राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, सत्यशोधक महिला प्रबिधिनीच्या प्रा. नूतन माळवी, अरुण कुुमार हर्षबोधी गजेंद्र सुरकार उपस्थित होते.
स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे हक्क, कर्मकांड, देव कशाला म्हणायचे, पाप, पुण्य, मोक्ष, कर्म यावर सखोल मार्गदर्शन करताना सोन्नर महाराज म्हणाले, भोळा भाभड्या समाजाला त्या वेळच्या ब्राह्मणी समाज व्यवस्थेने पाप-पुण्याची भीती दाखवून, मोक्ष व कर्माची लालूच दाखवून नव-नवीन अंधश्रद्धा, कर्मकांड, यज्ञ, उपवास, पूजा-पाठ यामध्ये गुंतवून लुटण्याचा बाजार सुरू केला.
याच काळात चतुवर्ग चिंंतामणी सारखा धार्मिक ग्रंथ हेमाद्री सारख्या सेनापतीने १३ व्या शतकात लिहून अधिक कर्मकांडात या समाजाला बुडवले. महिलांना दुय्यम स्थान देवनू चपलेइतकी किंमत दिली. त्याच्याकडून पुजेच्या नावाने, यज्ञ करण्याच्या नावाने पैसा, द्रव्य दान रुपाने घेवून त्याला गरीब, कंगाल बनविले. ब्राह्मण श्रेष्ठ, त्याच्या पाया पडून पुण्य कमवा असे विचार त्या काळी पसरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले. संचालन कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार नरेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला भरत कोकावार, सारिका डेहनकर, अॅड. पूजा जाधव, मंगेश शेंडे, मयूर राऊत, मयूर डफडे, अनिल मुरडीव, राजेंद्र ढोबळे, सुनील सावध, रजनी सुरकार यासह अनेकांत स्वाध्याय मंदिरचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)