पाण्यासाठी तीन तास ठिय्या
By Admin | Updated: March 8, 2017 01:31 IST2017-03-08T01:31:39+5:302017-03-08T01:31:39+5:30
येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढत मंगळवारी ...

पाण्यासाठी तीन तास ठिय्या
गिरड ग्रामपंचायतीत घागर घेवून महिलांची धडक
गिरड : येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढत मंगळवारी सकाळी १० वाजतापासून ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले. पाण्याच्या मागणीकरिता संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयापुढे तब्बल तीन तास ठिय्या दिला. यावर ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने सरपंच चंदा कांबळे आणि उपसरपंच विजय तडस यांनी येत्या १५ दिवसांत ही समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन महिलांना दिले. या कालावधीत मार्ग निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला.
गिरड येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित असून या नळयोजनेला नागपूर जिल्ह्यातील सिर्सी नाला प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र या जिल्ह्यातील भारनियमन असल्याने त्याचा फटका पाणी पुरवठा योजनेला बसतो. परिणामी ग्रामपंचायतीला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाने यावेळी महिलांना सांगितले.