कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:27+5:30

तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली.

The streets of billions have thousands piled | कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

ठळक मुद्देसंडे अँकर । आर्वी नाका ते जुनापाणी चौक मार्ग, अल्पावधीतच पितळ उघडे, ‘पॅचिंग’चे काम युद्धस्तरावर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी नाका चौक ते जुना पाणी चौकापर्यंत रस्त्याला कित्येक ठिकाणी भेगा गेल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याला ठिगळं लावण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवली असून हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.
तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली. तरीदेखील कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम सुरूच ठेवले. रस्ता बांधकाम करताना आर्वी मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. राजकीय पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अतिक्रमणकर्त्यांकडे डोळेझाक करण्यात आली. याशिवाय अनेक ठिकाणचे वीजखांबही हटविण्यात आले नाही. रस्त्याचे बांधकाम करताना गुणवत्तेचा विचारच झाला नाही. त्यामुळे आज वाहनांच्या आवागमनामुळे अनेक ठिकाणचे सिमेंट निघून जात आहे. तर ठिकठिकाणी शेकडोवर भेगा पडलेल्या असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने पॅचिंगचे काम मागील आठवडाभरापासून युद्धतस्तरावर सुरू आहे. अल्पावधीतच रस्त्याचे पितळ उघडे पडल्याने गैरप्रकार झाल्याचीही आता ओरड होत आहे. रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला निधी पाण्यात गेल्याचेही नागरिक बोलत आहेत.

आर्वी मार्गालगत नालीचे नियमबाह्य बांधकाम
आर्वी मार्गालगत नालीचे बांधकाम केले जात आहे. यात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. नाल्या उंच बांधण्यात आल्या असून जुन्या नाल्यांशी त्या मिळत नसल्याने या नाल्यांमधील पाणी जुन्या नाल्यांमध्ये येत आहे. शिवाय नालीचे बांधकाम सरळ न करता नागमोडी पद्धतीने करण्यात आले आहे. याला देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या अभियंत्यांचीही मूकसंमती असल्याचे दिसून येते. नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना देयकेही अदा केली जात असल्याने बांधकाम विभागाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

हा रस्ताही ठरला विकासाचा ‘नमुना’
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले. मात्र, रस्ता सिमेंटीकरणानंतर चेंबरवर झाकणे बसविण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी चेंबर व तर कुठे खाली असल्याने वाहनचालकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्याचे बांधकामही शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

Web Title: The streets of billions have thousands piled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.