आर्वी नाक्याची अजब व्यथा
By Admin | Updated: July 12, 2015 02:20 IST2015-07-12T02:20:02+5:302015-07-12T02:20:02+5:30
पाच रस्ते असलेला आर्वी नाका शहरातील सर्वात मोठा चौक म्हणून नावारुपास येत आहे. वाढत असलेल्या वर्दळीमुळे येथे सुविधा असणे अपेक्षित आहे.

आर्वी नाक्याची अजब व्यथा
रूपेश खैरी /प्रशांत हेलोंडे वर्धा
पाच रस्ते असलेला आर्वी नाका शहरातील सर्वात मोठा चौक म्हणून नावारुपास येत आहे. वाढत असलेल्या वर्दळीमुळे येथे सुविधा असणे अपेक्षित आहे. पालिका प्रशासन सुविधा पुरविण्यात तर पोलीस प्रशासन या चौरस्त्यावरील वाहतुकीला नियम लावण्यात अपयशी ठरत असल्याने येथे नागरिकांची चांगलीच कोंडी होत आहे.
३२ हजार चौरस फुटाचा परिसर असलेल्या या चौकात प्रशासनाने कुठलीही सुविधा वा सौंदर्यीकरण केले नसल्याने या चौकात अवकळा आल्याचे चित्र आहे. कधी शिकलकरी समाजाच्या वास्तव्याने चर्चेत असलेला हा चौक आता येथील वडारवस्तीमुळे चर्चेत आहे. राज्य शासनाच्यावतीने आकारण्यात येत असलेला जकात कर रद्द करण्यात आल्याने सन १९९२-९३ मध्ये येथील नाका बंद झाला. असे असले तरी या चौकाचे आर्वी नाका चौक हे नाव अद्यापही कायम आहे. राष्ट्रसंतांचा पुतळा बसवून चौकाला त्यांचे नाव देण्याचा ठराव पालिकेत झाला. याला १० वर्षापेक्षा अधिक काळ झाला तरी पुतळा बसविण्याचा विसर पालिकेला पडल्याचे दिसत आहे. यामुळे चौकाला राष्ट्रसंतांचे नाव मिळणे अद्याप तरी शक्य झाले नाही.