वादळी पावसाचा तडाखा; घरांची पडझड
By Admin | Updated: June 14, 2014 23:46 IST2014-06-14T23:46:03+5:302014-06-14T23:46:03+5:30
आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष

वादळी पावसाचा तडाखा; घरांची पडझड
प्रचंड नुकसान : झाडे उन्मळून वीज खंडित
आर्वी, कारंजा (घा़) : आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष उन्मळून पडल्याने वीज खंडित झाली़
कारंजा तालुक्यातील ढगा आणि गारपीट या दोन गावांत गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले़ जंगलव्याप्त गावांत ४० ते ४५ घरांचे छत उडाले. टिनपत्रे व कवेलू उडाल्याने शेकडो ग्रामस्थ उघड्यावर आले. कुडाची घरे जमीनदोस्त झालीत़ गारपीट या गावात ७१ घरे अंशत: पडली़ यात २ लाख ६४ हजारांचे नुकसान झाले़
सहा कोठे अंशत: तर पाच कोठे जमीनदोस्त झाले़ यात ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले़ ३५ ते ४० घरांची पडझड झाली. ढगा गावात ३७ घरे अंशत: पडली़ यात २ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाले़ नुकसानीची पाहणी रात्री नायब तहसीलदार बर्वे, तलाठी व त्यांच्या चमूने केली.
आर्वी तालुक्यातही गुरूवारी रात्री वादळी पावसाचे आगमन झाले़ यात नांदपूर, शिरपूर, वर्धमनेरी, खुबगाव, वाठोडा, निंबोली, वागदा, सर्कसपूर, वाढोणा, जळगाव, बाजारवाडा आदी गावांत जोरदार पावसाची नोंद झाली़ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ काही ठिकाणी वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता़ टाकरखेडा येथेही वादळी पावसामुळे अनेकांच्या घरांची टिनपत्रे उडालीत़ वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली़ यामुळे वाहतूक ठप्प होती़ (तालुका प्रतिनिधी)