पुरंदरेच्या पुरस्काराविरोधात वर्धेत रास्ता रोको
By Admin | Updated: August 19, 2015 02:19 IST2015-08-19T02:19:49+5:302015-08-19T02:19:49+5:30
राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना देऊ केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, या मागणीकरिता संभाजी ब्रिगेड, ...

पुरंदरेच्या पुरस्काराविरोधात वर्धेत रास्ता रोको
नागपूर महामार्गावर जाळपोळ : तासभर वाहतुकीचा खोळंबा
वर्धा : राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना देऊ केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, या मागणीकरिता संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपूर महामार्गावर टायरची जाळपोळ करून निषेध नोंदविला. यावेळी किमान तासभर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
बुधवारी पुरंदरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी राजा शिवछत्रपती या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला, इतिहासाचे विकृतीकरण केले, असा या संघटनांचा आरोप आहे. पूर्वग्रहदूषित बुद्धीने शिवचरित्राची मांडणी करून आयुष्यभर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास आहे. त्यामुळे पुरंदरे यांनी इतिहासलेखनाशीदेखील द्रोह केला आहे. पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करणे म्हणजे खोट्या इतिहासाला प्रतिष्ठा मिळवून देणे होय, असेही संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचे म्हणणे आहे.
राज्यभरातील पुरोगामी संघटना, नामवंत साहित्यिक, इतिहासतज्ज्ञांनी पुरंदरे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची शहानिशा केल्यानंतरच हा पुरस्कार द्यायला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.