सेलू बसस्थानकावर जलद गाड्यांचा थांबा द्या

By Admin | Updated: November 16, 2014 23:11 IST2014-11-16T23:11:43+5:302014-11-16T23:11:43+5:30

येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते.

Stop fast trains at Sailu Bus Station | सेलू बसस्थानकावर जलद गाड्यांचा थांबा द्या

सेलू बसस्थानकावर जलद गाड्यांचा थांबा द्या

सेलू : येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते. त्यामुळे सर्व जलद गाडया या बसस्थानकावर याव्या अशी मागणी प्रवासी वर्गातून वारंवार केली जात आहे.
काही वर्षापूर्वी सर्व सुपर बसगाड्यांसह जनता गाड्या या स्थानकावर थांबून पूढे जायच्या. परंतु तालुकास्तरावरील महत्त्वाचे बसस्थानक आज मात्र दुर्लक्षित झाले. रात्रीचा अंधार पडण्याआधीच येथे सर्व सामसूम झालेले असते. निर्मनुष्यतेचा फायदा घेत येथे अनुचित प्रकार वाढत असल्याची लोकांना भीती आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व बसगाड्या स्थानकात याव्या असे सर्वांना वाटते, मात्र बसस्थानकावर बसगाड्यांचे आवागमन करताना वाढते अतिक्रमण व रस्त्याच्या दुतर्फा दुकानाचा त्रास होतो. यामुळे बसचालक बसस्थानकावर बस पोहचवू शकत नाही. ग्रामपंचायत व बांधकाम विभाग यांनी समन्वय ठेवून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण कमी केले तर बसस्थानकावर बस पोहचू शकते.
ग्रामपंचायत प्रशासन या प्रयत्नात आहे. त्यांनी सिमेंट रस्त्याच्या दोनही बाजूला डांबरी रस्त्याचे जोड लावून रस्ता मोठा केला. रस्त्याच्या मधात येणारे हनुमानजींचे मंदिर दुसरीकडे स्थानांतरित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही मंडळी मंदिराला हटविण्याबाबत तसेच विशालकाय झाडाला कापण्याचाही विरोध आहे. सर्वांचा विश्वास संपादन करुन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळून हे मंदिर हटविण्यात आले तर वळणावर रस्ता मोठा होवून वाहतुकीची कोंडी सुटू शकते. परंतु मंदिर हटविण्याची प्रक्रिया थोडी अडचणीची ठरत असल्याने कामास विलंब होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासन सर्व जलद बसगाड्या गावात येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्या जाते. बायपास थांब्यावर प्रसाधनग्रह उभारण्यास जागा नसल्याने प्रवाशांची व विशेषता: महिलांची कुचंबना होते. यामुळे गावातील बसस्थानकावर सर्व बसगाड्यांचा थांबा असल्यास सर्व प्रश्न मिटू शकतात. त्यामुळे बसगाड्या बसस्थानकावर याव्यात अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Stop fast trains at Sailu Bus Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.