कामगार कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवा
By Admin | Updated: February 14, 2016 01:50 IST2016-02-14T01:50:54+5:302016-02-14T01:50:54+5:30
स्थानिक जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात अस्थायी कर्मचारी कंत्राटी स्वरुपात नियुक्त केले आहे.

कामगार कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवा
उपनिबंधक कामगार उपायुक्तांना मजदूर युनियनचे निवेदन
वर्धा : स्थानिक जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात अस्थायी कर्मचारी कंत्राटी स्वरुपात नियुक्त केले आहे. सदर कार्मचारी हे इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सदर भ्रष्टाचार थांबविण्याकरिता चौकशी करून त्यांची या कार्यालयातून बदली करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे गवंडी बांधकाम मजदूर युनियनतर्फे उपनिबंधक कामगार उपायुक्त नागपूर यांना करण्यात आली.
जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय वर्धा येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्यांना मिळणाऱ्या योजनांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे. पण वर्धा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे एजंट मार्फत आलेल्या ठराविक लाभार्थ्यांचे फॉर्म जास्तीचे पैसे घेत स्वीकारत असल्याचा आरोप संघटनेद्वारे केल जात आहे. इतर लाभार्थ्यांच्या फॉर्ममध्ये अनावश्यक त्रुटी काढून ते परत पाठविण्याचे सत्रच सुरू आहे. ही बाब येथील कामगार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कार्य प्रणालीमध्ये कुठलाही फरक पडलेला नसल्याचेही निवेदनात नमूद आहे.
कामगार अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त चार्ज असल्यामुळे ते वर्धा कार्यालयाला आठवड्यातून केवळ एक दिवस राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण नसल्याचाही आरोप होत आहे. तेथील भ्रष्टाचार हा विकोपाला गेला असून कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सोबतच त्यांना अमानुषतेची वागणूकही दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणापासून लांब अंतरावर असलेल्या तालुक्यातील अनेक कामगारांच्या नोंदण्या खोळंबल्या आहे. परंतु कामगार अधिकारी यांना वारंवार भेटूनही त्यांनी यावर उपाय योजला नाही. याउलट तेथील कर्मचाऱ्याशी हितगुज जोपासणाऱ्या कामगारांच्या नोंदण्या मात्र मागील दारातून करून घेतल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
याला तेथील कर्मचारी आशिष खंडाळकर, ठाकरे व अस्थायी कर्मचारी हिना खान व नितीन दरवरे हे जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करीत कार्यालयातून बदली करण्यात यावी. तसेच कामगार अधिकारी पूर्ण वेळाकरिता नियुक्त करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाने करण्यात आली. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रामटेके, उपाध्यक्ष शरद रामटेके, सचिव संतोष सेलूकर, हंसराज पानतावणे, महेंंद्र गेडाम, बंडू फुलझेले, हेमंत शेळके, शेख नजीर, प्रमोद उरकुडे, विठ्ठल शेंडे, संजय डोंगरे, अतुल गोटे, राम गणवीर, सुभाष लोहकरे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)