रोकड व कारसह चोरटे पसार
By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T01:01:30+5:302014-05-27T01:01:30+5:30
येथील सिव्हील लाईन परिसरात भारत हाऊसिंग सोसायटी येथे एका घरी चोरी तर दोन घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यात केळकर यांच्या घरून एक लाख रुपये रोख,

रोकड व कारसह चोरटे पसार
सिव्हील लाईन परिसरातील घटना : दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
वर्धा : येथील सिव्हील लाईन परिसरात भारत हाऊसिंग सोसायटी येथे एका घरी चोरी तर दोन घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यात केळकर यांच्या घरून एक लाख रुपये रोख, सोन्याचे दागिणे व त्यांच्या मालकीची कार घेवून चोरटे पसार झाले. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. चोरटे चोरीच्या कारने नागपूरकडे रवाना झाले असून त्यांच्या शोधात पोलीस नागपूरकडे रवाना झाले आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हील लाईन येथे अरुण केळकर, अनुजा केळकर या त्यांचा पुतण्या अतुल व त्याच्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. काल अतुल त्याच्या पत्नीसह दहेगाव येथे गेला होता. घरी केवळ अरुण व अनुजा होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. अनुज व अरुण खालच्या खोलीत झोपून असल्याने त्यांनी तिजोरीच्या किल्ल्या मिळवित वरच्या माळ्यावर असलेल्या अनुजच्या खोलीत प्रवेश केला. चोरट्यांनी अतुलच्या कपाटातील साहित्याची फेकाफेक करीत रोख एक लाख रुपये लंपास केले. सोबतच घरातील ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, १५ ग्रॅम वजनाचा नेकलेस, सात ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सोन्याच्या चार अंगठ्या व ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे तसेच देवघरातील चांदीच्या मूर्ती लंपास केल्या. चोरट्यांनी केळकर यांच्या घरून त्यांची एम एच ३२ सी ४३५८ क्रमांकाची कार घेवून पळ काढला. सकाळी अनुजा उठल्या, त्या देवघराकडे देवांचे दर्शन घेण्याकरिता गेल्या असता त्यांना देवघरात देव नसल्याचे दिसून आले. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अतुल केळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीत चोरट्यांनी एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केले. पोलिसांनी चौकशी केली असता आणखी दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही.(प्रतिनिधी)