पिपरी मेघे परिसरात ‘जागते रहो’

By Admin | Updated: October 25, 2014 22:46 IST2014-10-25T22:46:28+5:302014-10-25T22:46:28+5:30

आठवडाभरापूर्वी शुक्रवारी रात्रीच्या सुमारात शहराजवळील पिपरी (मेघे) परिसरातील प्रगतीनगर, गांजरे ले-आऊट व सिंदी (मेघे) परिसरातील वृंदावननगर तसेच नागठाणा शिवारात २० ते २५ चोरट्यांनी

'Stay awake' in Pipari Megha area | पिपरी मेघे परिसरात ‘जागते रहो’

पिपरी मेघे परिसरात ‘जागते रहो’

वर्धा : आठवडाभरापूर्वी शुक्रवारी रात्रीच्या सुमारात शहराजवळील पिपरी (मेघे) परिसरातील प्रगतीनगर, गांजरे ले-आऊट व सिंदी (मेघे) परिसरातील वृंदावननगर तसेच नागठाणा शिवारात २० ते २५ चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी रात्रभऱ्यात तब्बल नऊ घरफोड्या केल्या. यात सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागठाणा परिसरातील एका महिलेला मारहाण करण्यात आली. अद्यापही अनेक चोरट्यांचा सुगावा लागलेला नसल्याने या परिसरांमध्ये जागते रहो अशी स्थिती असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिवाळसणाच्या सुरुवातीलाच चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सण असल्याने प्रत्येकाच्याच घरी थोडा तरी पैसा हा असतोच. नेमकी हीच संधी साधत एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल नऊ ठिकाणी दरोडा घालत पोबारा केला. तसेच चोरी करून लगेच पळून जाता येईल अशाच घरात चोरी केल्याने निदर्शनास आले. अद्यापही यातील काही चोरटे फरार आहेत. त्यामुळे पुन्हा चोरी होईल या भीतीने नागरिकांची दिवाळी भीतीच्या सावटात आणि अर्धवट झोपेतच जात आहे.
शहरानजीकच्या पिपरी (मेघे) तसेच सिंदी मेघे परिसरात या काही वर्षात लोकवस्ती वाढली आहे. नवनवीन ले-आऊट तयार झाले आहे. शहरात जागा मिळत नसल्याने अनेकांनी या भागात घरे बांधली आहेत. बरीच घरे या भागात बांधली गेली असली तरी त्या मानाने स्ट्रीट लाईटची व्यवस्था योग्य पद्धतीने आढळत नाही. तसेच हा भाग शहरालगत येत असला तरी तो ग्रामपंचायत भागात येत असल्याने पोलीस प्रशासनाचीही तितकीशी गस्त या परिसरात नसते. तसेच हा परिसर हायवेला लागून असल्याने चोरट्यांसाठी या भागात चोरी करून पळून जाणे हे सोयीचे ठरते. त्यामुळे या भागात चोरीच्या घटना या वारंवार घडत असतात. वस्ती वाढली असली तरी ती विरळ आहे. पक्के रस्ते सर्वत्र झालेले नाही. अनेक ले आऊट खाली आहेत. त्यामुळे एका घरात चोरी होत असली तरी त्या आवाजाची भनक बाजूच्या घरापर्यंत जातेच असे नाही. या कारणाने येथे चोरी करणे चोरींंना सोयीचे होते. सध्या दिवाळीचे दिवस आहेत. त्यामुळे घरे जरी रोषणाईने सजली असली तरी परिसरातील रस्त्यांवर मात्र अंधारच पहावयास मिळतो. सध्या वातावरण शांत असले तरी चोरी केव्हा होईल हे सांगता येत नाही. दिवाळीला बहुतेकांना सुट्ट्या असल्याने नागरिक बाहेरगावी जाण्याचा विचार करतात. परंतु चोरीचे सत्र सुरू असल्याने घर बंद करून बाहेरगावी जावे कसे असा प्रश्न पडला आहे. चोरी करणारे एकाएकी चोरी करीत नसून घरी कोण असतं, बाहेर कोण जातं, अशा अनेक बाबींची माहिती चोरट्या पद्धतीने घेत असतात. अशा वेळी म्हातारी माणसेच घरात आहेत अशी संधी मिळतात चोरी करीत असल्याची बरीच उदाहरणे पहावयास मिळत आहे. तसेच आठवडाभरापूर्वी झालेल्या दरोड्यात तसेच या आधीही शहरासह ग्रामीण भागात झालेल्या दरोड्यात अनेकांवर धारदार शस्त्राने हल्लाही करण्यात आला आहे. त्यामुळेही केवळ म्हातारी माणसे किंवा महिलांना घरात ठेवून बाहेरगावी जाणेही धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे दिवाळीला कुठेही न जाता रोषणाई लवकर बंद करून घरात अर्धवट जागे राहण्यातच पिपरी व सिंदी (मेघे) परिसरातील नागरिक धन्यता मानत आहे. एकाच रात्री तब्बल नऊ दरोडे पडूनही अद्याप ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच हा प्रकार घडल्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालणे, पेट्रोलिंग करणे गरजेचे असतानाही ते चांगल्या प्रकारे होताना दिसत नाही. या सर्व कारणाने परिसरात नागरिकांमध्यी भीतीचे वातावरण असून जागते रहो अशी स्थिती दिसून येत आहे. तसेच दरोड्याच्या घटनांवरून चोरटे हिंसक असल्याचे लक्षात येत असल्याने जीवाला धोका आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Stay awake' in Pipari Megha area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.