महावीर बालोद्यानावर झुडुपी जंगलाचे राज्य

By Admin | Updated: November 2, 2015 01:39 IST2015-11-02T01:39:29+5:302015-11-02T01:39:29+5:30

रामनगर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वृद्धांचा विरंगुळा व्हावा यासाठी येथील पाण्याच्या टाकीजवळ भगवान महावीर उद्यान व बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली;...

State of Jhalupe forests on Mahavira Balodiatia | महावीर बालोद्यानावर झुडुपी जंगलाचे राज्य

महावीर बालोद्यानावर झुडुपी जंगलाचे राज्य

कीर्ती स्तंभाला झाडांचा विळखा : खेळण्याचे साहित्यही आले मोडकळीस
वर्धा : रामनगर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वृद्धांचा विरंगुळा व्हावा यासाठी येथील पाण्याच्या टाकीजवळ भगवान महावीर उद्यान व बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली; पण आजघडीला येथील बालोद्यानाला तसेच उद्यानाची मूळ ओळख असलेल्या कीर्ती स्तंभाला पूर्णपणे झुडपी झाडांनी वेढले आहे. एवढेच नव्हे तर बालोद्यान असलेला फलकही घाणीच्याच ढिगाऱ्यात असल्याचे दिसते.
एकंदरीत स्थिती पाहता शहरातील सर्वच उद्यान व बालोद्यानासाठी केलेला खर्च हा व्यर्थ झाल्याचेच निदर्शनास येते. शहरातील एकही उद्यान आज सुस्थितीत नाही. अशीच अवस्था भगवान महावीर बालोद्यानाचीही झाली आहे. येथे असलेली लहान मुलांची खेळणी ही मोडकळीस आली आहे. पाळणे पूर्णत: तुटलेले आहे. त्यामुळे उद्यानात दाखल झाल्यावर येथे बालोद्यान कुठे असे विचारल्यास ते शोधूनही सापडणार नाही. सर्वच खेळण्यांभोवती झुडपी झाडे उगवली आहे. त्यामुळे लहान मुलेच काय मोठी माणसेही येथे फिरकत नाही. बालोद्यान सुस्थितीत आणण्यासाठी आजवर नगर परिषद प्रशासनाद्वारे अनेक प्रयत्न झाले. तरीही या बालोद्यानाची दुरवस्था कायम असून काही दिवसात ही स्थिती आणखी बिकट होणार असल्याचे दिसते. त्यामुळे मुलांनी खेळावे कुठे हा प्रश्न शेवटी उरतोच.(शहर प्रतिनिधी)

रात्रीला चालतात अवैध धंदे
महावीर बालोद्याची दुरवस्था झाल्याने याचा कोणताही उपयोग सध्या लहान मुलांना होत नसला तरी मद्यप्राशन व अवैध धंदे करीत असलेल्यांसाठी मात्र ही जागा आता मोक्याची झाली आहे. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार येथे घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत असतात.

लोकप्रतिनिधीही उदासीन
उद्यानाची स्वच्छता होत नसल्याने झुडपी झाडे वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास तसेच येथील नागरिकांनाही सहभाग दिल्यास उद्यानाचे मूळ सौंदर्य परत मिळू शकते. परंतु लोकप्रतिनिधी आणि येथील नागरिकांच्या उदासीनतेमुळे ही दुरवस्था झाल्याचे दिसते.

बालोद्यानाचा फलकच उकिरड्यात
बालोद्यान येथे असल्याची माहिती देणारा फलकच उकिरड्यात आहे. या फलकाला लागूनच सिमेंटची पायली व लोखंडी कंटेनर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फलकाची दुरवस्था तर झाली आहेच पण विशेष म्हणजे कचरा टाकण्यासाठी दोन दोन सुविधा असतानाही कचरा मात्र या दोहोंच्या मधात खाली जागेत टाकला जातो. कचराकुंडीचा उपयोगही होत नसताना फलकाची दुरवस्था होत आहे.

वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याची जागाच नाही
लहान मुलांसोबत वयोवृद्धांनाही विरंगुळा व्हावा यासाठी शहरातील बहुतेक उद्यानाप्रमाणेच रामनगर येथील भगवान महावीर उद्यान व बालोद्यान निर्माण करण्यात आले. परंतु येथील झुडपी जंगलांचे राज्य पाहून कुणीही वृद्ध या परिसरात फिरकत नसल्याचे वास्तव आहे.


सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका
वाढलेल्या झुडपांमुळे या परिसराताला अवकळा आली आहे. झुडपी जंगलांमुळे येथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असण्याचा धोका आहे. साप, विंचू, असे प्राणी येथे असल्याची शक्यता या झुडपांमुळे नाकारता येत नाही.


उद्यानातील साहित्य मोडकळीस
मुलांना खेळण्यासाठी येथे काही साहित्य ठेवण्यात आले होते. परंतु यातील बहुतांश खेळणी ही मोडकळीस आली आहे. पाळणे पूर्णत: तुटले असून त्यांचे खांबही जंगले आहे. तसेच त्यालाही झुडपी झाडांचा विळखा आहे.


स्तंभालाही गवताचा विळखा
भगवान महावीरांच्या नावाने या बालोद्यानाची निर्मिती करण्यात आल्याने येथे भगवान महावीर कीर्ती स्तंभाची उभारणी करण्यात आली. यावर महावीरांची काही वचनेही कोरण्यात आली. परंतु ही वचनेही झुडपी गवतांमध्ये आज दिसेनासी झाली आहे.

Web Title: State of Jhalupe forests on Mahavira Balodiatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.