वीज वितरण कंपनीत कंत्राटदारांचे राज्य
By Admin | Updated: November 10, 2014 22:49 IST2014-11-10T22:49:03+5:302014-11-10T22:49:03+5:30
स्थानिक वीज वितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कंत्राटदाराकडून घरगुती व कृषीपंप जोडणीकरिता लूट सुरू आहे. याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे अनेक घटनांवरून उघड झाले आहे.

वीज वितरण कंपनीत कंत्राटदारांचे राज्य
सेलू : स्थानिक वीज वितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कंत्राटदाराकडून घरगुती व कृषीपंप जोडणीकरिता लूट सुरू आहे. याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे अनेक घटनांवरून उघड झाले आहे.
अनेक वीज ग्राहकांनी घरी नवीन मीटरसाठी अर्ज केले तर काहींनी कृषीपंपासाठी अर्ज केले. कंत्राटदारांनी या ग्राहकांची दिशाभूल करून लाखो रुपये गोळा केले़ अनेकांना वीज जोडणीही दिली नाही. स्थानिक वीज कंपनीचे अभियंता अशा कामाचे प्राकलन तयार करून वरिष्ठांकडे मंजुरीकरिता पाठवितात; पण अधिकारी हे काम कंत्राटदाराकडे आहे, त्यालाच रक्कम द्या, असे सांगत आहेत. यामुळे कंत्राटदार मनात येईल तेवढी रक्कम घेतो. यातच काहीेंना जोडणी मिळते तर काहींना ताटकळत ठेवण्यात येते. हा प्रकार सेलू उपविभागात सर्रास सुरू आहे. काही धनाढ्य लोकांनी या कंत्राटदारांना पैसा देऊन आपली कामे काढून घेतली आहेत़ यात अनेकांचे प्लॉट, रस्ते, इमारतींपासून गेलेले अनेक वर्षांपूर्वीचे खांब व तारा त्वरितच हलविल्याचे सेलू परिसरात दिसून येत आहे. इश्वर नामक कंत्राटदार या अधिकाऱ्यांच्या कृपेने मस्तवाल झाला असून अलिकडे वीज ग्राहकांकडून नगदी नसेल तर चेकनेदेखील लाखोंच्या रकमा घेतल्याचे भक्कम पुरावे हाती आले आहेत़ या कंत्राटदाराला असलेल्या पाठबळाचे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ असे अर्थकारण होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. सेलू वीज वितरण कंपनीचा कारभार अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी सुरू असून नाममात्र कामांसाठी हजारो रुपयांची देयके कंत्राटदारांच्या नावावर काढण्याचा सपाटा सुरू आहे. यातील काही हिस्सा जिल्हास्तरावरही अधिकाऱ्यांना पोहोचता केला जात असल्याचे कंत्राटदार खुलेआम सांगतात़ यामुळेच की काय, या प्रकारावर कारवाई होत नसल्याचे दिसते़(तालुका प्रतिनिधी)