शकुंतलेच्या कामास सुरुवात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:41 IST2019-06-29T21:41:38+5:302019-06-29T21:41:48+5:30

येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.

Start the work of Shakuntala | शकुंतलेच्या कामास सुरुवात करा

शकुंतलेच्या कामास सुरुवात करा

ठळक मुद्देविदर्भ शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत आर्वी व देवळी पुलगाव या दोन्ही मतदारसंघात भाजपला मताधिक्य होते; परंतु शकुंतला रेल्वेबाबत भाजपने केवळ आश्वासन दिले. आश्वासनाची पूर्ती न झाल्यानेच लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आर्वी व देवळी-पुलगाव या दोन्ही मतदारसंघात विजय मिळू शकला नाही. परिणामी, दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला या दोन्ही मतदारसंघात मताधिक्य असले तरी ती निवडणूक राष्ट्रीय सुरक्षा या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून मतदान झाल्याने भाजपवर परिणाम झाला नाही. तरी येणाºया विधानसभा निवडणुकीत मागील निकालाचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरूडपर्यंत वाढविण्याचे आश्वासन देऊन मंजुरी मिळाल्याचे अनेकदा जाहीर सभांमधून भाजपच्या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही आर्वीच्या जाहीरसभेत याचा पुनरुच्चार केला. पण, लबाडाचे आमंत्रण..., या म्हणीप्रमाणे जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत नाही, तोपर्यंत मतदारांचा विश्वास बसत नाही.
पुलगावचे नागरिक तालुक्याच्या मागणीसाठी मंत्र्यांना निवेदने देतात; पण ज्या रेल्वे मार्गामुळे पुलगाव रेल्वेस्थानकाला जंक्शनचा दर्जा आहे, त्या मार्गाच्या कामाबाबत पुलगावकर मंडळी कधीच बोलत नसल्याची खंत कृती समिती सदस्य व्यक्त करतात. या रेल्वे लाईनवरील भंगार अवस्थेत पडलेल्या मालमत्तेची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे.त्यामुळे रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होऊन त्याचे विस्तारीकरण होईल, याबाबत जनतेच्या मनात नाराजी व संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याकरिता व आर्वी तथा देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात आपले आमदार निवडून आणायचे असल्यास या रेल्वे प्रकल्पाच्या कामास सुरूवात होणे गरजेचे असल्याचे परखड मत कृती समितीचे सदस्य व्यक्त करीत असून तशी मागणी करीत आहेत. लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांवर तर विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यांवर जिंकली जाते, याचे भान ठेवून १५ आॅगस्टपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी व त्यासाठी ५ जुलैला मांडल्या जाणाºया केंद्रीय अर्थसंकल्पात तशी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Start the work of Shakuntala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.