दोन महिन्यांत होणार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला प्रारंभ
By Admin | Updated: January 12, 2016 02:01 IST2016-01-12T02:01:13+5:302016-01-12T02:01:13+5:30
शासनाच्या आरोग्य मंत्रालयाद्वारे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला २६ डिसेंबर १९९७ च्या आदेशाप्रमाणे मंजुरी देण्यात आली.

दोन महिन्यांत होणार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला प्रारंभ
‘लोकमत’चा पाठपुरावा : ४ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त
गौरव देशमुख वायगाव (नि.)
शासनाच्या आरोग्य मंत्रालयाद्वारे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला २६ डिसेंबर १९९७ च्या आदेशाप्रमाणे मंजुरी देण्यात आली. मात्र यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही. याबाबत २००८ आणि २०१० मध्ये पत्रव्यवहार झाला. लोकमतने प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली. परिणामी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून त्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. दोन महिन्यात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
२६ डिसेंबर १९९७ च्या शासनादेशानुसार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. शासनाच्या आदेशानंतर कार्यवाहीत प्रारंभ होणे अपेक्षित होते. पण बरीच वर्ष याबाबत कुठलिही प्रक्रिया झाली नाही. २०१० मध्ये करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरीच नसल्याने कळविण्यात आले होते. असे असले तरी १७ जानेवारी २०१३ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात राज्यातील २५२ पैकी १२० प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १३२ प्राथमिक केंद्राचे काम जागेची निश्चितता न झाल्याने थांबल्याचे सांगण्यात येत आहे.
१३२ पैकी २५ प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचे प्रस्ताव केंद्रात समावेषित आहेत. उर्वरीत १०७ प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये वर्धा जिल्ह्यात ५ प्राथमिक आरोग्य केंंद्रांना मान्यता देण्यात आली. मात्र १७ जानेवारी २०१३ च्या आदेशानुसार केंद्राची जागा निश्चिती व मंजुरी झाल्या नंतर ५ वर्षाच्या आत केंद्राकरिता येणाऱ्या एकूण खर्चाचे नियोजन आणि पदाची निर्मिती करणे बंधनकारक आहे. या साठी प्रत्येक वर्षी स्वतंत्रपणे प्रत्येक आरोग्य संस्थेच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधीच्या उपलब्धतेसाठी आरोग्य सेवा संचालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही आहे.
जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहेत. वायगाव(नि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची मंजुरी व प्रशासकीय अडचणी याबाबत लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी जिल्ह्यात सर्वात प्रथम वायगाव(नि.) येथे जागा मंजूर होऊन सर्व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३ कोटी ८० लाख रुपये निधी बाधकांत विभागाच्या सुपूर्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच नवीन प्राकलनात आता ४ करोड २५ लाख रुपये मंजुर करण्यात आल्याचीही माहिती आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज महिनाभरात सुरू होणार आहे.
केंद्राचे काम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
वायगाव(नि.) येथील बहुप्रतिक्षित प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच साकार होणार असल्याने २३ वर्षाची प्रतीक्षा सार्थक झाल्यचे बोलल्या जात आहे. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासकीय रुग्णसेवेची वाणवा असल्यानेच परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पहावयास मिळतो. आता वायगाव व परिसरातील ग्रामस्थांना शासकीय रुग्णसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे वायगाव आणि परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे.
१९९७ मध्ये मंजूर झालेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्यक्ष साकार होत आहे. प्रक्रिया पूर्ण झाली असून ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधीही बांधकाम विभागाकडे जमा झाला आहे. दोन महिन्यांत कामाला प्रारंभ होणार आहे. ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पदाची निर्मिती होईल. शासकीय रुग्णसेवा उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
गावाची लोकसंख्या ही १५ हजारांच्या घरात आहे. गावालगत लहान मोठी २० गावे आहेत. बाजारपेठ असल्याने ग्रामस्थांना वायगाव येथे यावे लागते. २५ वर्षापूर्वी या गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. यात ग्राम पंचायतीने जागाही निश्चित केली होती. पण या आरोग्य केंद्राची पळवापळवी झाली होती. राजकीय दबावाचा वापर करुन वायगाव(नि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव(टा.) येथे पळविण्यात आले होते.
आरोग्य विभागाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. पुढील प्रक्रिया बांधकाम विभाग करणार आहे. ७५ टक्के बांधकाम झाल्यावर पद निर्मिंती केली जाईल.
- डी. जी. चव्हाण,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा