नव्या बदलांसह सलून व्यवसाय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:28+5:30
जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर सलून दुकाने असून ८० ते ९० टक्के लघु व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच व्यावसायिकांसह कुटुंबाचे पोट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून व्यवसाय पूर्णत: ठप्प होता. नियमित व्यवसायाबरोबरच दशक्रिया, गंधमुक्ती, जावळे आदी कार्यक्रमदेखील बंद असल्याने उत्पन्नाचे स्रोतच थांबले होते.

नव्या बदलांसह सलून व्यवसाय सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मागील दोन महिन्यांपासून सलून व्यवसाय ठप्प पडला होता. गुरुवारपासून सलून व्यवसाय सुरू करण्यास शासन-प्रशासनाने परवानगी दिली. सुरक्षितता म्हणून व्यावसायिकांकडून हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, डिस्पोझेबल कटिंग शीटसह टॉवेलचा वापर केला जात आहे.
जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर सलून दुकाने असून ८० ते ९० टक्के लघु व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच व्यावसायिकांसह कुटुंबाचे पोट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून व्यवसाय पूर्णत: ठप्प होता. नियमित व्यवसायाबरोबरच दशक्रिया, गंधमुक्ती, जावळे आदी कार्यक्रमदेखील बंद असल्याने उत्पन्नाचे स्रोतच थांबले होते. अनेक सलून व्यावसायिकांची दुकाने भाडे तत्त्वावर तर काहींची बँकांतून कर्ज काढून गाळे खरेदी केले आहेत. त्यामुळे दुकानाचे भाडे तसेच कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. सोबतच कारागिरांची देणी कशी द्यायची प्रश्नदेखील भेडसावत होता.
एकट्या वर्धा शहरात ३५० वर सलून दुकाने असून कारागिरांची संख्याही मोठी आहे. व्यवसायच ठप्प असल्याने व्यावसायिकांसह कारागिरांवर मोठे संकट ओढवले होते. गुरुवारपासून जिल्हा प्रशासनाने सलून दुकाने सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली. व्यवसाय करताना व्यावसायिकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, डिस्पोझेबल कटिंग शीट, नवे टॉवेल आदींचा वापर व्यावसायिक करीत आहेत. याकरिता ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत. सुरक्षेची बाब म्हणून ग्राहकही पैसे देत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात दोन हजारांवर दुकाने
एकट्या वर्धा शहरासह जिल्हाभरात दोन हजारांवर सलून दुकाने आहेत. या व्यवसायावरच ५ ते ६ हजार कारागीर, व्यावसायिकांची उपजीविका चालते. जिल्हा प्रशासनाने पालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सलून दुकाने गुरुवार शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस तर ग्रामीण भागातील व्यवसाय सातही दिवस सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.
कटिंग, दाढीचे भाव वधारलेत
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नव्या बदलांसह आता सलून व्यवसाय केला जात असल्याने व्यावसायिकांनी कटिंग आणि दाढीचे भाव वाढविले आहेत. पूर्वीच्या दरात या संकटकाळात ग्राहकांना सुविधा देणे अवघड बाब आहे. याकरिता कटिंगकरिता आता ६० रुपयांवरून १०० तर दाढीसाठी ४० रुपयांवरून ६० रुपये आकारले जात आहेत.
मोबाईलवरूनच बुकिंग
दुकानात होणारी गर्दी टाळण्याकरिता मोबाईवरून कटिंग-दाढीकरिता बुकिंग केले जात आहे. ग्राहकांच्या सुविधकेरिता सलून व्यावसायिकांनी मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. ग्राहक संपर्क करून व्यावसायिकाकडून वेळ घेत आहेत. यात ग्राहकांची गैरसोय टळत आहे.
दुकानाबाहेर झळकताहेत फलक
शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील सलून दुकानांच्या दर्शनी भागावर सुरक्षेच्या अनुषंगाने फलक लावण्यात आले आहेत. यात ग्राहकांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू संक्रमण रोखण्याकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच उपाययोजना केल्या जात आहेत. शासन-प्रशासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. व्यावसायिकांसोबतच ग्राहकांनी सहकार्य करावे.
लीलाधर येऊलकर, अध्यक्ष, जिल्हा सलून असोसिएशन, वर्धा