नागपूर-भुसावळ प्रवासी रेल्वेगाडी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:42 IST2019-07-15T22:42:29+5:302019-07-15T22:42:49+5:30
नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

नागपूर-भुसावळ प्रवासी रेल्वेगाडी सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी केले.
धरणे आंदोलनादरम्यान जोरदार नारेबाजी करून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्विकारले. बंद करण्यात आलेली नागपूर-भूसावळ पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व सिलेंडर यांची झालेली भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात जाचक ठरत असलेली सिव्हीलची अट रद्द करून त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा. सरसकट संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली चाराटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात याव्यात. पीक विम्यातील घोळाची चौकशी करून संबंधित कंपन्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता वनविभागाने योग्य पावले उचलावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शिवाय येत्या १५ दिवसात या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.