खादी बोर्डामार्फत हजार अंबरचरखे सुरू करा
By Admin | Updated: October 4, 2015 02:58 IST2015-10-04T02:58:27+5:302015-10-04T02:58:27+5:30
तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला.

खादी बोर्डामार्फत हजार अंबरचरखे सुरू करा
आश्रम प्रतिष्ठानची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन सादर
सेवाग्राम : तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला. जमिनीचा मोबदलाही ठरला. परंतु आराखड्याच्या कामापूर्वी जेष्ठ गांधीवादी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांची बैठक मुंबईला ठरवावी. तसेच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून रोजगारासाठी लोक शहराकडे जात आहे. विदर्भ कापूस उत्पादनाचा प्रांत असल्याने शासनाने एक हजार अंबर चरखे खादी ग्रामोद्योग बोर्डामार्फत सुरू करावेत, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली.
गांधीजींच्या १४६ व्या जयंती पर्वावर राज्याचे अर्थ व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे महात्मा गांधी आश्रमला भेट देण्यासाठी आले असता सदर मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
निवेदनातून सेवाग्राम विकास आराखडा, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ, बलुतेदारांचा प्रश्न आणि वर्धा जिल्हा दारूमुक्तीवर करावयाच्या उपाययोजना यावर प्रकर्षाने भर टाकून वास्तव पालकमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. वर्ध्यामध्ये ग्रामसेवा मंडळामध्ये स्लायव्हर प्लॅट सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी अंबर चरखे, कापसाचे गोदाम, आदी व्यवस्था करून देण्यात याव्या. महाराष्ट्रातील खादी संस्था यावर कार्य करू शकतील, यासाठी ंसदर मागणी करण्यात आली.
हजारो बलुतेदारांना वाऱ्यावर सोडून रोजी रोटीपासून वंचित करण्यात आले आहे. खादी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी आपणाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. बोर्डाची वाटचाल खाजगीकरणाकडे असल्याचे कर्मचाऱ्यांनी आश्रमला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले. त्यामुळे बलुतेदारांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूचे पाट वाहतात. त्यामुळे जिल्हा दारुमुक्त होण्यासाठी पिण्याचे परवाने टप्प्या-टप्प्याने रद्द करण्याचा विचार करावा, अशी मागणीही प्रतिष्ठाच्या वतीने जयवंत मठकर यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना केली. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे इतरही सहकारी उपस्थित होते.(वार्ताहर)
स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
सेवाग्राम : येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच वनविभागाच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाने अंत्यविधी शेड बांधून नियमांचे उल्लघंन केले आहे. याची शासनाने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आश्रमपुढील मार्गावर गांधी जयंतीदिनी करण्यात आले होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सेवाग्राम आश्रमात गांधीजयंतीनिमित्त आले असता त्यांना पांडुरंग गोसावी, ज्ञानेश्वर कुमरे यांनी निवेदन सादर करून ही मागणी केली. निवेदनानुसार ग्रामपंचायतीने २०१३ रोजी वनविभागाच्या आणि अत्यंविधीसाठी नसलेल्या जागेवर शेड बनविले. त्यामुळे शेत लागून असलेल्या शेतकऱ्यांने कोर्टात तक्रार दाखल केली. न्यायालयाने अंत्यविधी मनाईचा आदेश दिला. तरीसुद्धा शेडमध्ये अत्यंविधी करण्यात यावा यासाठी काही लोकांचा प्रयत्न असल्याचे निवेफनात नमूद आहे.
शासनाने १९६२ मध्ये ग्रा.पं. ला सर्वधर्मीय मोक्षधामासाठी सहा एकर जमीन दिली. पण यावर अतिक्रमण करून शेती करण्यात येत असल्याचेही निवेदनातून म्हटले आहे. त्यामुळे या समस्येकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.