टाकळीमार्गे कोळोणा-गौळ बसफेरी सुरू करा
By Admin | Updated: July 11, 2015 02:43 IST2015-07-11T02:43:31+5:302015-07-11T02:43:31+5:30
प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; ...

टाकळीमार्गे कोळोणा-गौळ बसफेरी सुरू करा
वर्धा : प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; परंतु, अनेक गावांत महामंडळाची बसच जात नाही. टाकळी (खोडे), गौळ, आंजी ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पुलगाव आगाराने गौळ, अडेगाव मार्गावरील बसेस वाटखेडा चौरस्ता येथून न नेता, टाकळी (खोडे) मार्गे कोळोणा चौरस्ता, गौळ या मार्गाने वळवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
देवळी येथून ही बस सुटल्यानंतर वाटखेडा चौरस्त्यापर्यंत एकही गाव येत नाही. तर टाकळी वरून बस गेल्यास टाकळी येथील नागरिकांची गैरसोय दूर होऊन प्रवासीसुद्धा मिळू शकतात. या गावतील अनेक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. गावात बस जात नसल्यामुळे एकपाळा चौरस्त्यावर विद्यार्थी, महिला व प्रवाशांना ऊन्ह, पाऊस व थंडीच्या दिवसात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते.
टाकळी येथून बसेस गेल्यास आंजी व गौळ परिसरातील नागरिकांना एकपाळा येथे जाणे सोयीचे होणार आहे. याच मार्गावर हनुमान मंदिर असून येथे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे भाविकांसाठी सोयीचे होईल, असे गावकरी बोलत आहेत.
एकमेकांशी गावे जोडून गावातील दळणवळणाला चालना मिळेल. सध्या स्थितीत हा रस्ता सुसज्ज असून डांबरीकरणसुद्धा करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून बसेस धावण्याकरिता महामंडळाकडून हालचाली करण्यात आल्या. तिकिटांचे टप्पेसुद्धा ठरण्यात आले. परंतु बसेस सुरू करण्याकरिता कुठली अडचण आली हे समजायला मार्ग नाही. याकडे पुलगाव आगारप्रमुख लक्ष देऊन या मार्गावरील बस सुरू करावी, अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)