देवळीत सीसीआयच्या कापूस खरेदीला प्रारंभ
By Admin | Updated: November 17, 2015 03:51 IST2015-11-17T03:51:06+5:302015-11-17T03:51:06+5:30
स्थानिक श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीत सीसीआयच्यावतीने कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. विदर्भातील काही

देवळीत सीसीआयच्या कापूस खरेदीला प्रारंभ
देवळी : स्थानिक श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीत सीसीआयच्यावतीने कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. विदर्भातील काही निवडक ठिकाणापैकी देवळी येथे खरेदी सुरू झाली. यावेळी कापूस उत्पादकांची गर्दी होती. मुहूर्तावर हमीभावात चार हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्यासह उपसभापती संजय कामनापुरे, सचिव लहू खोके व सीसीआयचे ग्रेडर पन्नालाल सिंग यावेळी उपस्थित होते.
दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने ४ हजार २०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला होता; परंतु अल्पावधीतच हा भाव ३ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे या परिसरातील कास्तकारांचे सीसीआयच्या खरेदीकडे लक्ष लागले होते. या हंगामात सोयाबीनने धोका दिल्यामुळे दिवाळीच्या सणात कापसाशिवाय पर्याय नसलेल्या कास्तकारांनी बाजारात कापूस आणून सण साजरा केला. त्यामुळे या सणापर्यंत देवळी केंद्रावर ३५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद आहे.
खरेदीच्या अनुषंगाने सीसीआयच्यावतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर काही निर्बंध लावण्यात आले. मार्केटमध्ये कापूस आणताना संबंधित कास्तकाराने स्वत:च्या बँक खात्याची साक्षांकित प्रत सोबत आणावी. ही सर्र्व कागदपत्रे असल्याशिवाय कापसाची खरेदी केली जाणार नाही. तसेच जिल्ह्याच्या बाहेरील कापूस खरेदी केल्या जाणार नसल्याचे सीसीआयचे ग्रेडर पन्नालाल सिंग यांनी सांगितले.
खरेदीच्या वेळी बाजार समितीचे संचालक सुशील तिवारी, राजाभाऊ खेडकर, देवानंद भगत, शंकर ठाकरे, श्रीधर लाभे, प्रवीण ढांगे, प्रदीप लुटे, प्रमोद वंजारी, अयुबअली पटेल तसेच व्यापारी माणक सुराणा, नरेश अग्रवाल, ज्योतवाणी व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)