कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

By Admin | Updated: October 29, 2016 00:54 IST2016-10-29T00:54:21+5:302016-10-29T00:54:21+5:30

केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे.

The staff of the trash can suffer | कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

पालिकेकडे तक्रार : आरोग्यविषयक समस्यांनी घेरले
वर्धा : केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीला लागूनच कचऱ्याचा ढोला ठेवला आहे. येथील कचरा ढोल्यातच पेटविण्यात जातो. त्यामुळे निघाणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिक आणि कार्यालयातील कर्मचारी वर्गाला होत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही हा प्रकार सुरूच असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिली आहे.
येथे ठेवण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढोल्यात परिसरातील नागरिक कचरा टाकतात. यात कचरा जमा झाला नसला तरीही दररोज कचरा पेटविण्यात येतो. यामुळे कचरा कुंडीतील धूर इमारतीच्या तावदानातून पूर्ण इमारतीमध्ये पसरतो. अशात कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बसून कामकाज करणे असह्य होते. त्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कचरा पेटविताना कचऱ्यातील प्लास्टिक, थर्माकोल जळाल्याने विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाला काम करताना डोकेदुखी आणि श्वसनाचे विकार बळावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी याविषयी तक्रार केली. मात्र हा प्रकार आजतागायत सुरुच आहे. तसे पाहता येथील कचरा गोळा करुन अन्यत्र नेऊन विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा कार्यालयाचे इमारतीला लागून असलेली कचराकुंडी तात्काळ हलविण्यात यावी किंवा योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी केली. यावेळी ए.बी. कडू, ए.आर. वडे, सी.जे. भुसारी, मोना मानेकर, आर.एस. थुल, पंकज भारसाकळे, जी.एन. शेळके, ठाकूर, नांदुरकर, पोचमपल्लीवार, वडते, माळी, आडे, डफ, पाटील, जाधव, रोहणकर, नरेंद्र नागतोडे, नितनवरे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

येथील कर्मचारी वर्गाला दमा, फुफ्फुसांचे आजार, डोळ्यांचे व श्वासाचे, घश्याचे आजार बळावत आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहे.
कचरा पेटविताना यातून बाहेर पडत असलेल्या घातक वायुमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. यापूर्वी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराविषयी लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. परंतु पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.
पालिकेचे कर्मचारी येथील कचरा नियमीत उचलत नाही तर पेटवुन देतात. याप्रमाणे कचरा पेटविल्याने प्राणीमात्रांना धोका असतो. शिवाय यातून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. पुढील धोका टाळण्याकरिता येथील कचरा उचलुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. अन्यथा याप्रमाणे कचरा पेटविणे बंद करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: The staff of the trash can suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.