एस.टी. महामंडळाला रिक्त पदांचे ग्रहण

By Admin | Updated: May 5, 2016 02:10 IST2016-05-05T02:10:04+5:302016-05-05T02:10:04+5:30

राज्यासह जिल्ह्यात प्रवाशांसाठी अत्यावश्यक सेवा बनलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात;

S.T. Employee receives vacant posts | एस.टी. महामंडळाला रिक्त पदांचे ग्रहण

एस.टी. महामंडळाला रिक्त पदांचे ग्रहण

कर्मचारी वर्गावर ताण : निरंतर भरती प्रक्रियेच्या अभावामुळे २८१ पदे रिक्त
गौरव देशमुख वर्धा
राज्यासह जिल्ह्यात प्रवाशांसाठी अत्यावश्यक सेवा बनलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात; पण वर्धा जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या २८१ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यास विलंब होत असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वापरून सेवा देणारे महामंडळ कर्मचाऱ्यांचा ताण कधी कमी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात एसटीची सेवा पोहोचली आहे. चालक आणि वाहक हे या सेवेचा कणा मानले जातात. त्याबरोबर मेकॅनिक व इतर प्रशासकीय अधिकारी वर्गीय कर्मचारीही यंत्रणा सुनियोजितपणे चालण्यासाठी प्रयत्नरत असतात; पण २४ तास सुरक्षित सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांवर रिक्त पदांमुळे दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे.
जिल्ह्यात ३२० बस असून गर्दीच्या व यात्रेच्या कालावधीत जादा बसची व्यवस्था करावी लागते. वर्धा विभागात चालक, वाहक, सहाय्यक व मेकॅनिकल या पदावर सुमारे १ हजार ५०६ कर्मचारी आहे. यामध्ये ५९९ वाहक तर ६४७ चालक आहेत. त्याचबरोबर ११९ सहायक तर मेकॅनिकल या पदावर १४१ कर्मचारी कार्यरत आहेत. दरवर्षी सेवा निवृत्तीसह इतर कारणांनी ही पदे रिक्त होत आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यात २८१ पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमुळे इतर चालक व वाहकांना अधिकचे काम करावे लागत आहे. यासाठी त्यांना अतिरिक्त वेतन मिळत असले तरी त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण दिवसेंदिवस वाढत आहे. ‘सांगताही येईना अन् सहनही होईना’, अशी अवस्था झाल्याचे कर्मचारी सांगतात. इतर रिक्त पदांवरही वाहकांना प्रतिनियुक्ती देण्यात येते. त्यामुळे रिक्त जागांचा भार पेलताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
महामंडळाने रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे. यात चालकांच्या ३९ रिक्त पदापैकी एप्रिल महिन्यात ३३ पदांसाठी भरती करण्यात आली आहे. यात वाहक, चालक या दोन्ही बॅच नंबरसह भरती करण्यात आली. त्यामुळे यांना चालक व वाहक या दोन्ही पदांसाठी कामी आणू शकता येत असल्याचे सांगण्यात आले. तरीही अद्याप सहा पदे रिक्तच आहे.
तसेच पर्यवेक्षकांची २७ पदे रिक्त होती. यापैकी तीन पदे भरली असून अद्याप २४ पदे रिक्त आहे. वाहक पर्यवेक्षक, यांत्रिकी, मेकॅनिकल, लिपीक, वाहतूक नियंत्रक, चतुर्थश्रेणी व इतर अशी एकूण २८१ पदे रिक्तच आहे. यातील ३६ पदे भरण्यात आल्याची माहिती आहे; पण सदर कर्मचारी प्रशिक्षणावर असल्याने ती पदे अजून भरलेली नाही. उर्वरित रिक्त पदे भरण्यासाठी विभागामार्फत पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून दोन ते तीन महिन्यांत या रिक्त जागा भरण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांची होत आहे दमछाक
दरवर्षी काही कर्मचारी सेवानिवृत्त होतात. इतरही काही कारणांनी जागा रिक्त होत असतात; पण त्या तुलनेत भरती प्रक्रिया नियमित होत नसल्याने रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. याचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येत असून त्यांची पुरती दमछाक होते. एस.टी. महामंडळाने भरती प्रक्रिया निरंतर ठेवली तर हा प्रकार होणार नाही. पण हा सर्व कारभार वरिष्ठांमार्फत चालत असल्याने नाइलाज होत आहे.

प्रवाशांना जीवाचा प्रश्न
चालकांच्याही काही जागा रिक्त आहेत. तसेच अनेक कारणांमुळे कर्मचारी सुटीवर असतात. अशावेळी इतर चालकांना अतिरिक्त काम करावे लागते. यासाठी त्यांना अतिरिक्त पैसा मिळत असला तरी जास्त कामामुळे चालकाचे बसवरून नियंत्रण सुटू शकते. यामुळे अपघाताच्या घटनाही घडू शकतात.

रिक्त असलेल्या जागा
वर्धा विभागात चालकाची ३९ पदे रिक्त होती. पैकी एप्रिलमध्ये ३३ पदे भरण्यात आली असून ६ पदे अद्याप रिक्त आहेत. निव्वळ वाहकाची एकूण ४२ पदे रिक्त आहेत. पर्यवेक्षकाच्या २७ पदांपैकी ३ पदांवर नियुक्ती करण्यात आली असून २४ पदे रिक्तच आहे. घटक संवर्ग स्थानिक भरतीमध्ये लिपिक, वाहतूक नियंत्रक, शिपाई, अशी ५८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे यांत्रिकीमध्ये मेकॅनिकल विभागातही तब्बल १०५ पदे रिक्त आहे.

Web Title: S.T. Employee receives vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.