६०० हेक्टरवर संत्र्याची फळ गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:14+5:30

ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) परिसरात मुसळधार पाऊस झाला. याच पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर तर संत्रा या फळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संत्रा पिकावर बुरशी सदृष्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. इतरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात फळगळतीही झाली.

Squeeze the orange fruit on 600 hectares | ६०० हेक्टरवर संत्र्याची फळ गळ

६०० हेक्टरवर संत्र्याची फळ गळ

Next
ठळक मुद्देपावसाचा फटका : नैसर्गिक आपत्तीच्या नियमावलीत मिळणार १८ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. इतकेच नव्हे तर संत्रा उत्पादकांच्या अडचणीत मोठी भर टाकली आहे. जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यात संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात असले तरी ऑक्टोबरच्या अखेरच्या आवठड्यात परिसरात झालेल्या पावसामुळे तब्बल ६०० हेक्टरवरील संत्रा पिकाची फळ गळ झाली असून तशी नोंद कृषी विभागाने घेतली आहे. तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असला तरी कुठल्या नियमावलीत बसवून संत्रा उत्पादकांना शासकीय मदत द्यायची असा पेच सध्या कायम आहे. शासनाने जर नैसर्गिक आपत्तीच्या नियमावलीत नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना समाविष्ट केल्यास त्यांना हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) परिसरात मुसळधार पाऊस झाला. याच पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर तर संत्रा या फळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संत्रा पिकावर बुरशी सदृष्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. इतरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात फळगळतीही झाली. शेतकऱ्यांकडून ओरड झाल्यानंतर कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.
याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील एकूण ६०० हेक्टरवरील संत्रा पिकाची फळ गळती झाल्याची नोंद घेण्यात आली. शिवाय तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नुकसानग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाकडून भरीव मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनाही आहे.
जर शासनाने संत्रा पिकाचे झालेल्या नुकसानाची भरपाई नैसर्गिक आपत्तीच्या नियमांना केंद्रस्थानी ठेऊन दिली तर संत्रा उत्पादकांना हेक्टरी १८ हजार रुपये शासकीय मदत मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. असे असले तरी हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.

सिंचितला १३,५०० अन् फळ पिकांना १८ हजार शासकीय मदतीची शक्यता
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची माहिती गोळा करीत सर्वेक्षण करून पंचनामे केले जात आहेत. सदर काम सध्या कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तयार होणारा अंतिम अहवाल जिल्ह्यातील तीन बड्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासन दरबारी सादर केला जाणार आहे. त्यानंतरच शासनाकडून नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीपोटी शासकीय मदत द्यायची की नाही याविषयी हिरवी झेंडी दिली जाणार आहे. जुनेच निकष केंद्रस्थानी ठेऊन शासनाने ३३ टक्केच्यावर नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर केल्यास सिंचित पिकांना हेक्टरी १३ हजार ५००, फळ पिकांसाठी १८ हजार तर हंगामी पिकांना ६ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर शासकीय मदत मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६०० हेक्टरवरील संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या पिकांची मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. शिवाय इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. नेमके किती नुकसान झाले याची माहिती घेत पंचनामे पूर्ण केले जात आहेत. सरते शेवटी अंतिम अहवाल तयार करून तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत द्यायची की नाही याचा निर्णय शासन घेणार आहे.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.

परतीच्या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक नुकसान
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात नेमके किती नुकसान झाले याबाबतच्या आकडेवारीची जुळवाजुळव सध्या कृषी आणि महसूल विभागाकडून केली जात आहे. परतीच्या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सुरूवातीला पुढे आले होते. परंतु, प्रत्यक्ष सर्वेक्षणात हा आकडा बऱ्यापैकी वाढत आहे.
समुद्रपूर तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून कृषी विभागाकडून सध्या युद्धपातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास सर्वाधिक नुकसान समुद्रपूर तालुक्यात झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Squeeze the orange fruit on 600 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती