वीटभट्टीमुळे वहिवाट झाली बंद
By Admin | Updated: December 18, 2014 23:00 IST2014-12-18T23:00:31+5:302014-12-18T23:00:31+5:30
शेतातील वहिवाटीवर अतिक्रमण करून वीटभट्टी सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या आवागमनाचा मार्ग बंद झाला आहे. यासंदर्भात रोठा येथील १२ शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक व वर्धा तहसीलदार

वीटभट्टीमुळे वहिवाट झाली बंद
वर्धा : शेतातील वहिवाटीवर अतिक्रमण करून वीटभट्टी सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या आवागमनाचा मार्ग बंद झाला आहे. यासंदर्भात रोठा येथील १२ शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक व वर्धा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. हा रस्ता पूर्ववत तयार करून वहीवाटी सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, रोठा येथील शेतकरी शंकर अजाबराव खैरकार यांच्या शेतातून जाणाऱ्या रस्ता त्यांनी आवागमनाकरिता बंद केला आहे. या शेतालगत असणाऱ्या अन्य बारा शेतकऱ्यांचा यामुळे वहिवाटीचा प्रश्न उद्भवला आहे. यापुर्वी या शेतकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. यानंतर अपर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येथे रस्त्याचे मोजमाप केले. यानंतर हा मार्ग तयार केला. जून २०१४ ला येथे रस्ता तयार झाला.यानंतर शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीस्कर झाले. शेतात जाण्याकरिता दुरवरचा फेरा मारून जाण्याचा त्रास वाचला. १० फुटाच्या या रस्त्यावर मात्र खैरकार याने पुन्हा अतिक्रमण करून येथे वीटभट्टी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना फेरा मारून जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाची परवानगी नसतानाही ही वीटभट्टी सुरू केली. या वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे पिकांना अपाय होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)