‘विदर्भ बंधन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 9, 2014 23:52 IST2014-08-09T23:52:01+5:302014-08-09T23:52:01+5:30
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. विदर्भ राज्य आता नाही तर कधीच नाही, असा सूर आवळत या मागणीकरिता विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रेल रोको, बस रोको आंदोलनाला

‘विदर्भ बंधन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
बस देखो आंदोलन : २५ हजार नागरिकांना विदर्भ बंधन
वर्धा : वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. विदर्भ राज्य आता नाही तर कधीच नाही, असा सूर आवळत या मागणीकरिता विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रेल रोको, बस रोको आंदोलनाला वर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी वर्धा बसस्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना विदर्भ बंधन बांधून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. या आंदोलनादरम्यान २५ हजारांवर प्रवाशांसह नागरिकांना ‘विदर्भ बंधन’ बांधून वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून दिले.
जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीच्यावतीने वर्धेत सदर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनासाठी आम्ही वर्धेकर समितीने जनतेत विविध मार्गाने जनजागृती करीत होती. सकाळी १०.३० वाजतापासूनच आम्ही वर्धेकर समितीचे पदाधिकारी, सभासद असंख्य विदर्भवाद्यांसह येथील बसस्थानकावर ‘विदर्भ बंधन’ घेऊन पोहचले. प्रत्येकाच्या डोक्यावर ‘जय विदर्भ’ अंकित केलेली टोपी होती. प्रत्येकजण हातात ‘विदर्भ बंधन’ घेऊन बसमधून उतरणाऱ्या आणि बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्त्व पटवून पत्रक देत हे बंधन मनगटावर बांधत होते. प्रवाशीही मोठ्या कुतुहलाने हे बंधन स्वीकारत होते.
इतकेच नव्हे, तर बसस्थानक परिसरातील दुकानदारांसह त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांनाही हे बंधन बांधले. दरम्यान सुमारे २५ हजार नागरिकांना या आंदोलनात सहभागी करुन घेतले.
क्रांतीदिनी रेल रोको, बस रोको आंदोलन करण्याचा इशारा जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीने वर्धेत घेतलेल्या एका बैठकीतूनच देण्यात आला होता हे विशेष. आम्ही वर्धेकरचे संयोजक हरिष इथापे, निमंत्रक संजय इंगळे तिगावकर, विजय जावंधिया, अविनाश काकडे, प्रदीप दाते, भास्कर इथापे, विजय आगलावे, राजू गोरडे, प्रा. शेख हाशम, पद्माकर बावीस्कर, प्रदीप जैन, आशिष गोस्वामी, नंदकुमार वानखेडे, मनोज कत्रोजवार, अशोक कठाणे, सुदाम पवार, वैभव काशीकर, मुरली केला, प्रदीप बजाज, सुनील पटेल, जितेंद्र झाडे, गुड्डू पठाण, प्रमोद गिरडकर, मुकेश लुथडे, संगिता इंगळे तिगावकर या मंडळींसह कार्यकर्त्यांची ये-जा करणाऱ्या नागरिकांना ‘विदर्भ बंधन’ बांधत वेगळ्या विदर्भाची गरज पटवून दिली. (प्रतिनिधी)