लघु उद्योगांसाठी स्पाईरूलिना प्रशिक्षण
By Admin | Updated: February 21, 2017 01:11 IST2017-02-21T01:11:15+5:302017-02-21T01:11:15+5:30
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे ‘आॅक्सीजन आणि पौष्टिक अन्न’ावर आधारित लघु उद्योगांकरिता...

लघु उद्योगांसाठी स्पाईरूलिना प्रशिक्षण
एमगिरीचा उपक्रम : आॅक्सिजन आणि पौष्टीक अन्नाचा आधार
वर्धा : महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे ‘आॅक्सीजन आणि पौष्टिक अन्न’ावर आधारित लघु उद्योगांकरिता ‘स्पाईरूलिना’ उत्पादनाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या तीन दिवसीय प्रशिक्षणात हरियाणा, गुजरात व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निरोप समारंभामध्ये जैव प्रसंस्करण आणि जडी-बुटी विभागाचे उपसंचालक डॉ. कर्मराज यादव ‘स्पाईरूलिना’च्या गुणधर्माबाबत म्हणाले की, स्पाईरूलिना एक शैवाळ प्रजाती आहे. यात ‘आरथ्रोसपिरा प्लाटेन्सिस’ आणि ‘स्पाईरूलिना मैक्सिमा’ या मुख्य प्रजाती आहेत. ते समजावून सांगताना म्हणाले की, संयुक्त राष्ट्राने १९७४ मध्येच स्पाईरूलिनाला पृथ्वीसाठी भविष्यातील सर्वोत्तम अन्न जाहीर केले होते. आज डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ आॅर्गनाइजेशन) ने स्पाईरूलिनाला सूपर फुड जाहीर केले आहे. या शैवाळामध्ये ६०-७० टक्के प्रोटीन आणि सर्व प्रकारचे विटामिन, खनिज घटक आणि अँटीआॅक्सीडेंट भरपूर प्रमाणात मिळतात. ज्याचा वापर रोगप्रतिकारक शक्तीची वाढ करण्यासाठी केला जातो. सोबतच यामध्ये नैसर्गिक निळा रंग (फायकोसायनिन) विपुल प्रमाणात असतो. आतापर्यंत स्पाईरूलिनाचा वापर मधुमेह, हृदयरोगाला नियंत्रित करण्यासाठी केला जात होता; पण आता त्याचा उपयोग घरे, कार्यालये आणि मोठ्या इमारतींमध्ये आॅक्सीजनचा स्तर वाढविण्यासाठी आणि कार्बनडाय आॅक्साईडचा स्तर कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे सांगितले.
एमगिरीने केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले की, ४० लिटर स्पाईरूलिना कल्चरपासून २००० चौरस फुटाच्या खोलीमध्ये आठ तासांत ४०० पीपीएम कार्बनडाय आॅक्साईड कमी होऊन १५२ पीपीएम होतो आणि आॅक्सीजनचा स्तर १५० ते २०० पीपीएमने वाढतो. सोबतच १५ ते २० ग्रॅम कोरडा स्पाईरूलिनासुद्धा मिळतो. यातील पौष्टिक घटकांचा अन्न म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. या प्रयोगामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी एमगिरीने तरूणांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.
एमगिरीच्या प्रभारी संचालक रितिका नरूला म्हणाल्या की, स्पाईरूलिनाचे हे मॉडेल पर्यावरणासाठी अत्यंत उपयोगी आहे. स्पाईरूलिनाच्या या मॉडेलचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना उद्योगासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. उपस्थितांचे आभार जयकिशोर छांगानी यांनी मानले. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विभागातील डॉ. अपराजिता वर्धन, शीतल शर्मा, निलेश काटकर, सूरज कोंबे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)