सकारात्मक वातावरणामुळे विकासकामांना गती
By Admin | Updated: May 19, 2016 01:51 IST2016-05-19T01:51:39+5:302016-05-19T01:51:39+5:30
जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय असल्यामुळे विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. असेच वातावरण राहिल्यास सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल,

सकारात्मक वातावरणामुळे विकासकामांना गती
आशुतोष सलील : मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप व नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
वर्धा : जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय असल्यामुळे विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. असेच वातावरण राहिल्यास सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल, असा विश्वास मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केला. तर नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रशासनातील सकारात्मक बदलाचा लाभ मला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
विकास भवन येथे मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निरोप तर नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी निलोत्पल, प्र. अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, प्र. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांची उपस्थिती होती.
मावळते जिल्हाधिकारी सलील यांचा नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांना सहसंचालक पदी अमरावती येथे पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांनाही अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्या हस्ते गौरविण्यात येऊन निरोप देण्यात आला. आभार तहसीलदार राहूल सारंग यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)
विकास भवन परिसरात वृक्षारोपण
नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते विकास भवन परिसरात निसर्ग सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.