अडीच एकरात एक पोतं सोयाबीन
By Admin | Updated: November 27, 2014 23:39 IST2014-11-27T23:39:15+5:302014-11-27T23:39:15+5:30
निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही,

अडीच एकरात एक पोतं सोयाबीन
नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा : कपाशीवरही लाल्याचे आक्रमण
विरूळ (आ़) : निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही, पोटात टाकण्याकरिता दाना नाही, हे वास्तव आहे, येथील डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावांचे़ या गावांची व्यथा शासनदरबारी महिती असताना कुणीच या भागात फिरकत नाही. नापिकीने गावातील पूर्ण सुख हरविल्याचे भयानक वास्तव येथे पाहावयास मिळते.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या सालधरा, काकडधरा, बोरी-बारा, खैरी, चिकटी, पाचोड, कृष्णापूर, रामपूर या गावांतील काही शेतकऱ्यांजवळ दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले; पण निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन सवंगण्याची गरज भासली नाही. एका शेतकऱ्याला अडीच एकरात केवळ एकच पोतं सोयाबीन झाले. सर्वच शेतकऱ्यांची अशीच स्थिती आहे. कपाशी आहे; पण त्यावर लाल्याचे आक्रमण झाले. आदिवासी भाग असलेल्या या गावातील हे विदारक वास्तव आहे. या गावातील शेतकरी एकेका दाण्याकरिता महाग झाला आहे. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सोयाबीन सवंगायचे कामच पडले नाही़ घरात जेवढा कापूस होता, तो बेभाव विकला, अन् घरात खाण्याकरिता अन्नाचा दाणा आणला. हाताला काम नाही, गावात दुसरे उत्पन्नाचे साधन नाही, आम्ही जगावे कसे... अशी हृदय हेलवणारी वाक्ये येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात़
सोयाबीन पीक झाले नाही. कपाशी पाण्याअभावी व लाल्याच्या आक्रमणामुळे वाळली. तुरीचे पीक जंगली श्वापदांनी फस्त केले. यामुळे नापिकीने शेतकरी पुरता गंजला आहे़ काहींच्या घरात तर अन्नाचा कणही नाही. धान्य आणण्यासाठी घरात असले नसले साहित्य विकून वा गहाण ठेवून आपली उपजीविका चालवावी लागत आहे. चिल्या-पिल्यांचे पोट भरण्यासाठी चाललेल्या या खटाटोपांतून ते या दुष्काळाचा सामना करीत आहेत. कधीकाळी हिरवागार राहणारा हा परिसर गत काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे़ ही बाब शासन दरबारी माहिती असताना कुणी तिकडे ढुंकून पाहत नसल्याचे दिसते़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, हाच खरा प्रश्न आहे़(वार्ताहर)