जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:19+5:30
पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्ग चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात जिल्ह्यात ढगाळी वातावरण होते. शिवाय अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. याच संभाव्य पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
वर्धा जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कपाशीचे उत्पादन प्रामुख्याने घेतली जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात विविध बियाणे कृषी विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. ५८ हजार ७०० क्विंटल सोयाबीन, १३ लाख ७१ हजार ५०० पाकीट कपाशी तर ३ हजार ५४२ क्विंटल तुरीचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत. सध्या स्थितीत त्यापैकी २२ हजार ५०० क्विंटल सोयाबीन, ३ लाख १० हजार पाकीट कपाशी तर ७५० क्विंटल तुरीचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करणार आहेत.
५.२५ टक्केच शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज
खरीप हंगाम तोंडावर आहे. परंतु, अद्यापही अनेक बँकांनी पीककर्जाची प्रकरणे निकाली काढलेली नसल्याचे वास्तव आहे. सध्यास्थितीत ४ हजार ५५८ शेतकºयांना पीककर्ज म्हणून ५४ कोटी रुपये बँकांनी दिले असून त्याची टक्केवारी केवळ ५.२५ असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होईल असे बोलले जात असल्याने बँकांनीही वेळीच पीककर्जाची प्रकरणे निकाली काढणे गरजेचे आहे.
तीन तालुक्यांत सोयाबीन बियाण्यांची सर्वाधिक विक्री
जिल्ह्याला प्राप्त बियाण्यांच्या साठ्यापैकी आतापर्यंत सुमारे ३० टक्के सोयाबीन, २२ टक्के कापूस व २५ टक्के तुरीचे बियाणे विक्री झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. असे असले तरी वर्धा, समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात सध्यास्थितीत सर्वाधिक सोयाबीनचे बियाणे विक्री झाल्याचे सांगण्यात आले.