‘ते’ सोयाबीन बियाणे सदोषच
By Admin | Updated: November 8, 2014 01:32 IST2014-11-08T01:32:57+5:302014-11-08T01:32:57+5:30
महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीवरुन सदर बियाण्यांचे नमुने वर्धेच्या ...

‘ते’ सोयाबीन बियाणे सदोषच
आष्टी (शहीद) : महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीवरुन सदर बियाण्यांचे नमुने वर्धेच्या गुणनियंत्रण पथकाकडे पाठविले. चार महिन्यांनी दिलेल्या अहवालात सदर बियाणे सदोष असल्याचे म्हटले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सुनील देशमुख, अनिल राणे, विठ्ठल सहारे या तिघांनी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाकडून महाबिज कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले़ १२ जुलै २०१४ रोजी सोयाबीन जे़एस़ ३३५ वाणाचे लॉट नंबर ११९५, ११९२, सिरीजच्या नऊ बॅग खरेदी केल्या़ त्याची पेरणी १७ जुलै २०१४ रोजी केली़ बियाण्यांची उगवण आठवडाभरात होते़; मात्र दहा-बारा दिवस लोटले तरी देखील बियाणे उगवले नाही़ पेरणीसाठी आलेला खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे २८ जुलै २०१४ रोजी लेखी तक्रार केली़ संबंधित अधिकाऱ्यांनी मोक्कापाहणी करण्याचे आश्वासन दिले़ त्यानुसार २ आॅगस्ट २०१४ रोजी शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी बाळासाहेब वेरूळकर यांनी पाहणी केली़ बियाण्यांची गुणनियंत्रण निरीक्षक बाब पूर्ण झाल्यावर लागलीच अहवाल देण्याचे सांगितले़ बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ शासनाच्या अधिकृत महाबिजवरही विश्वास राहिला नाही, अशी प्रतिक्रीया शेतकरी देशमुख, राणे, सहारे यांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केले़(प्रतिनिधी)