पेरलं ६० किलो अन् उगवलं ३० किलो
By Admin | Updated: November 9, 2014 23:17 IST2014-11-09T23:17:09+5:302014-11-09T23:17:09+5:30
एका दाण्याचे दहा करणारा व्यवसाय म्हणजे शेती, असे म्हटल्या जाते; मात्र यंदाच्या खरीप हंगामात याऊलट चित्र वाढोणा येथे दिसून आले आहे. येथील शेतकऱ्याने पेरा करताना ६० किलो सोयाबीन पेरले.

पेरलं ६० किलो अन् उगवलं ३० किलो
आजी (मोठी) : एका दाण्याचे दहा करणारा व्यवसाय म्हणजे शेती, असे म्हटल्या जाते; मात्र यंदाच्या खरीप हंगामात याऊलट चित्र वाढोणा येथे दिसून आले आहे. येथील शेतकऱ्याने पेरा करताना ६० किलो सोयाबीन पेरले. त्याची कापणी करून उत्पन्न काढण्याची वेळ आली असता त्यातून केवळ ३० किलो सोयाबीनच त्याच्या हाती आले. यामुळे हताश झालेल्या या शेतकऱ्याने रबीत काय करावे असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वाढोणा येथील शेतकरी वजीर पठाण यांच्याकडे दोन एकर शेती आहे़ यात त्यांनी सोयाबीनचा पेरा केला. यात पावसाने दगा दिला़ पहिली पेरणी उगविली नाही. यामुळे त्यांनी दुबार पेरणी केली. ती कशीबशी उगविली. शेतात पीक डोलू लागले़ त्यातच अतिवृष्टी झाली. उभे झालेले पीक पुरते झोपले. यामुळे शेतीला लावलेला खर्च निघेल अथवा नाही अशी चिंता शेतकऱ्याला पडली. काही ना काही नफा होईल असे म्हणत मळणीयंत्राने सोयाबीन काढले. यात सोयाबीनच्या दाण्याचा शोध घेतला असता कुटारच जमा झाले़ एक पोतही उत्पादन झाले नाही़ निघालेल्या सोयाबीनची मोजणी केली असता त्याचे वजन ३० किलो भरले़ शेतात दोन वेळा झालेल्या पेरणीत शेतकऱ्याचे ६० किलो सोयाबीन गेले. तेवढेही त्याच्या हाती आले नाही़(वार्ताहर)