‘त्या’ पिंपळ वृक्षाचा आवाज झाला बंद

By Admin | Updated: July 4, 2015 00:28 IST2015-07-04T00:28:07+5:302015-07-04T00:28:07+5:30

गत १५ दिवसांपासून स्थानिक धंतोली परिसरात हनुमान मंदिराजवळ पिंपळवृक्षाची कटाई केल्यानंतर येणारा...

The sound of 'that' pebbles turned off | ‘त्या’ पिंपळ वृक्षाचा आवाज झाला बंद

‘त्या’ पिंपळ वृक्षाचा आवाज झाला बंद

अ.भा. अंनिसकडून नागरिकांचे समुपदेशन
वर्धा : गत १५ दिवसांपासून स्थानिक धंतोली परिसरात हनुमान मंदिराजवळ पिंपळवृक्षाची कटाई केल्यानंतर येणारा ‘आवाज’ अखेर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी आणि समुपदेशनानंतर बंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
सविस्तर वृत्त असे की, धंतोली येथे हनुमान मंदिरासमोरील पिंपळाचे झाड अस्ताव्यस्त वाढल्याने आजूबाजूच्या घरांना नुकसान पोहचण्याची तसेच जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वादळवाऱ्याने झाड कोसळल्यास होणारा संभाव्य धोका लक्षात घेता नगरसेवक, मंदिर समिती आणि रहिवाशांच्या संमतीने त्या वृक्षाची कटाई केली. झाडाची कटाई केल्यापासून परिसरात चर्चेला पेव फुटले. त्यातच, गत पंधरा-वीस दिवसांपासून नागरिकांना ‘ओ काकू’, ‘ओ आजी’, ‘ओ वहिनी’ अशा हाका मंदिराजवळ ऐकायला येऊ लागल्या. या हाकांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
अ.भा. अंनिसचे जिल्हाध्यक्ष हरिश इथापे व राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर यांच्या नेतृत्वात अंनिसच्या चमुने या परिसराला भेट दिली. सुमारे अडीच तास चाललेल्या या तपासणीत परिसरातील अनेक नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या तपासणीत अंनिसच्या पदाधिकारी निष्कर्षाप्रत पोहचले. यानंतर संबंधित व्यक्तीला याबाबत समज देण्यात आली. यानंतर स्त्रीच्या आवाजात येणाऱ्या या हाकांचे रहस्य आणि त्यामागील कारणमीमांसा लक्षात येताच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक पवन राऊत यांच्या पुढाकाराने रहिवाशांची सभा बोलाविली. मानवी हस्तक्षेपाने सुरू झालेल्या या आवाजामागे कोणत्याही भूताखेताचा अथवा दैवी शक्तीचा हात नसल्याने जाहीर करून संबंधित व्यक्तींना हा प्रकार थांबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मंदिर अथवा पिंपळाच्या झाडावरून कोणतेही धर्मकारण अथवा राजकारण न करण्याचे आणि आपसातील सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन संजय इंगळे तिगावकर व हरिश इथापे यांनी केले. तसेच एखादी व्यक्ती अशा अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण पसरवत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते, याकडेही लक्ष वेधले.
मागील आठ दिवसांपासून भूताटकीचा असा कोणताही आवाज या परिसरात आला नसल्याचे नगरसेवक व नागरिकांनी सांगितले आहे. यावेळी अ.भा. अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)

ग्रहांना शांत करणाऱ्या बाबाचा भंडाफोड
तुमच्यावर ग्रहांची वक्रदृष्टी आहे. त्यामुळेच या दैवी भांड्यातील त्या ग्रहाला शांत करणारा खडा आपोआप हलत आहे. असे म्हणत येथील एका विद्यालयाच्या शिक्षकांना गंडा घालणाऱ्या बाबाचा गुरुवारी अ.भा. अंनिसचे जिल्हा संघटक व शासनाच्या पीआयएमसी समितीचे संयोजक पंकज वंजारे यांच्या उपस्थितीत भंडाफोड केला. मोहम्मद रफिक असे या बाबाचे नाव असल्याचे अंनिसच्यावतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रयोग करून दाखविल्याने शिक्षकांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. यानंतर शिक्षकांनी ते खडे परत केले.
मोहम्मद रफिक गत चार ते पाच वर्षांपासून हा प्रकार करीत असून ही केवळ हातचलाखी आहे. यापुढे असे कृत्य करणार नाही, असे अंनिसला लेखी स्वरूपात दिल्याचे कळविले आहे.

Web Title: The sound of 'that' pebbles turned off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.