निगेटिव्ह म्हणताच वर्धेकर झाले बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:26+5:30
दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यावर बुधवारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होईल याची जाण असताना वर्धा न.प.चे मुख्याधिकारी आपला ताफा घेऊन आर्वी नाका भागातील अतिक्रमण काढत होते. मुख्याधिकारीच नसल्याने मुख्य बाजारपेठेत कर्तव्य बजावणाऱ्या न.प.च्या कोविड योद्धांनी चालढकल केली. यामुळे ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

निगेटिव्ह म्हणताच वर्धेकर झाले बिनधास्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. याची दखल घेत जिल्ह्याधिकारी यांनी लॉकडाऊन मध्ये दिलेली शिथिलता मागे घेत दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर बुधवारी पुन्हा बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यावर बुधवारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होईल याची जाण असताना वर्धा न.प.चे मुख्याधिकारी आपला ताफा घेऊन आर्वी नाका भागातील अतिक्रमण काढत होते. मुख्याधिकारीच नसल्याने मुख्य बाजारपेठेत कर्तव्य बजावणाऱ्या न.प.च्या कोविड योद्धांनी चालढकल केली. यामुळे ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
दोन दिवसानंतर काही दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यावर पेट्रोलपंपवरही वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर मुख्य बाजारपेठेत विविध साहित्याची खरेदीकरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या नागरिकांच्या गर्दीत काही व्यक्ती विनाकारणच घराबाहेर पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वर्धा न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. परंतु, बुधवारी वर्धा न.प. प्रशासनाने बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत कर्तव्य बजावण्यासाठी पाठविले. शिवाय मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: दुपारी १२.३० पर्यंत वर्धा शहरातील आर्वी नाका भागातील अतिक्रमण काढण्यास प्राधान्यक्रम दिल्याने वर्धा नगर पालिकेतील कर्मचाºयांकडून मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. एकूणच आज मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या नाममात्र न.प.च्या कोविड योद्धांची चांगलीच दमछाक झाली होती.
वर्धा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे आज वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. असा भोंगळ कारभार कोरोनाच्या प्रसाराला खतपाणी देणारा आहे. याबाबतची रितसर तक्रार आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे.
- विकास दांडगे, जिल्हा प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष.
मुख्य बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून न.प.चे कर्मचारी नियुक्त केले आहे. शिवाय बुधवारी सकाळी सुरूवातीला गोलबाजारात आपण स्वत: हजर राहून कारवाई केली. त्यानंतर आर्वी नाका भागातील अतिक्रमण काढण्यात आले.
- प्रदीप जगताप, मुख्याधिकारी न.प. वर्धा.