‘त्या’ विद्यार्थ्यांना सोनपापडीतून विषबाधा

By Admin | Updated: September 14, 2014 00:06 IST2014-09-14T00:06:55+5:302014-09-14T00:06:55+5:30

वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वाटण्यात आलेली सोनपापडी खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांपैकी तिघांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली तर उर्वरित सहा

Sona-papidi poisoning for those students | ‘त्या’ विद्यार्थ्यांना सोनपापडीतून विषबाधा

‘त्या’ विद्यार्थ्यांना सोनपापडीतून विषबाधा

हिंगणघाट: वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वाटण्यात आलेली सोनपापडी खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांपैकी तिघांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली तर उर्वरित सहा विद्यार्थी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी काहींना ताप व पोटदुखी होत असल्याने रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील अंतरावरील पारडी (नगाजी) येथील जि.प. प्राथमिक शाळेत ही घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या शाळेतील आकांक्षा कांबळे (१२) या विद्यार्थिनीचा ११ सप्टेंबर वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिने वर्ग मैत्रीनींना घरी रात्री ७ वाजता बोलावून चिवडा व केक दिला होता. त्यानंर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ती शाळेत जात असताना तिने गावातील एका दुकानातून एक रुपयाप्रमाणे नऊ सोनपापडी विकत घेवून वर्गात गेली. ही सोनपापडी आठ विद्यार्थिनीला वाटून स्वत:ही खाल्ली. त्यानंतर काही वेळातच गौरव कांबळे या विद्यार्थ्याला विषबाधा झाली. त्याला प्रथमोचार सुरू असताना इतर आठही विद्यार्थ्यांना हातपाय जखडणे, पोटदुखी व जीव मरमळीचा त्रास होवू लागला. त्या सर्वांना बुरकोनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना उपजिल्हा रूग्णालय हलविण्यात आले.
या विषबाधा प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक शंकर निमसरकर शिक्षक बंडू बैलमारे यांनी वरिष्ठांना याची माहिती देवून रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता मोटार सायकलने बुरकोनी व आॅटोने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आणले. विषबाधा झालेल्या हर्षाली कांबळे (१२), आकांक्षा कांबळे (१२), श्रद्धा जगताप (१२), पल्लवी आत्राम (१२), अनिशा अवथरे (१२), नैना कोरडे (११) या सर्व सहा विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रीती कछवे (१२), हर्ष अतकरे (१२) व गौरव कांबळे यांना सुटी देण्यात आली. हे सर्व विद्यार्थी इयत्ता सहावी व सातवीचे आहेत. या घटना कळताच नायब तहसीलदार दांडेकर, गट शिक्षणाधिकारी हरिहर पेंदामकर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पिट्टलवार, केंद्र प्रमुख विद्या बोभाटे यांनी रुग्णालयात येवून उपचारासंबंधी व घटनेसंबंधी आढावा घेतला; परंतु अन्न सुरक्षा प्रशासनाचा एकही अधिकारी २४ तासात फिरकला नाही. विषबाधा सोनपापडीतून झाली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे. अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रूईकर व चमु विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sona-papidi poisoning for those students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.