युवकांच्या समस्यांचे निराकरण भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात
By Admin | Updated: October 5, 2015 02:17 IST2015-10-05T02:17:51+5:302015-10-05T02:17:51+5:30
अमर्याद भोगवादाच्या व्यापामुळे आज युवकांपुढे मोठेमोठी आव्हाने निर्माण केली आहेत.

युवकांच्या समस्यांचे निराकरण भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात
अंबरनाथ भाई : राष्ट्रीय युवा संमेलन
वर्धा : अमर्याद भोगवादाच्या व्यापामुळे आज युवकांपुढे मोठेमोठी आव्हाने निर्माण केली आहेत. मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला आणि आज मंगळावर पोहचण्याच्या योजना बनविण्यात येत आहेत. यात आपण एकमेकांच्या हृदयापासून दूर जात आहोत याचा विसर पडला आहे. युवकांपुढील आव्हानांचे उत्तर भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात आहे. भूतकाळाचा वारसा घेत, भविष्याचे चिंतन करावे लागेल, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ गांधीवादी अंबरनाथ भाई यांनी केले.
निवेदिता निलयम युवा केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त येथे आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आजची आव्हाने आणि युवक या विषयावर निवेदिता निलयम युवा केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त तीन दिवसीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ भाई म्हणाले, आज बेरोजगारी ही मोठी समस्या आपणच निर्मित केलेली आहे. पूर्वी अविष्काराची जननी आवश्यतेला मानायचे पण आज अगोदर आविष्कार केला जातो आणि नंतर आवश्यकता बनविल्या जातात. ग्रामउद्योग, लघुउद्योगाशिवाय या देशाला रोजगार मिळू शकणार नाही आणि मोठे उद्योग फक्त पर्यावरणाच्या समस्या आपल्या समोर उपस्थित करतील असेही ते यावेळी म्हणाले. माजी खासदार आणि गांधीवादी नेते डॉ. रामजी सिंह, सामाजिक कार्यकर्ते आर. सुन्दरेशन, गांधी शांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राधा बहन भट्ट, किशन गोरदिया, गीताई मिशनच्या प्रवीणा देसाई, डॉ. बेलखोडे यावेळी उपस्थित होते.
भोपालचे अमित कोहली म्हणाले, या संमेलनाच्या निमित्ताने युवकांना समाजाच्या दिशा आणि दशा याबद्दल काय जाणवते याबाबत विस्तृत चर्चा व्हावी, युवक बोलेल, समजेल तेव्हाच देशात विधायक कामाला गती मिळेल आणि त्याचसाठी या केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले. २० राज्यातील ५०० तरूणांनी यात सहभाग घेतलेला आहे. तथा शेकडो स्थानिक युवकांचाही सहभाग आहे, निवेदिता निलयम युवा केंद्राची बाबा आमटे यांच्या भारत जोडे सायकल यात्रेनंतर १९९० मध्ये यात्रेतील काही तरूणांनी प्रवीणा देसाई यांच्या मार्गदर्र्शनामध्ये स्थापना केली. यावर्षी रौप्य वर्षानिमित्त युवकांशी विविध सत्राच्या माध्यमातून युवकांना सामाजिक जबाबदारीसाठी प्रवृत्त करणे आणि सामाजिक कामात सहभागी करून घेणे संमेलनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)