मंगलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी
By Admin | Updated: August 25, 2015 02:46 IST2015-08-25T02:46:36+5:302015-08-25T02:46:36+5:30
अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगला वरठी हिच्या पतीने तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुऱ्हाडीने तिच्या शरिराचे

मंगलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी
वर्धा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगला वरठी हिच्या पतीने तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुऱ्हाडीने तिच्या शरिराचे तुकडे केले. शनिवारी सायंकाळी ही घटना उघड झाली. यात तिच्या पतीसह अनेक दारूविक्रेत्यांचा सहभाग आहे. यामुळे या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शहरातील सर्वच दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
मृतक मंगला वरठी ही दारूबंदी महिला मंडळाची सक्रिय सदस्य होती. त्यामुळे त्या भागातील अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर तिचा वचक होता. यामुळेच ती त्यांच्या निशाण्यावर होती. तिचा वर्धेतील विविध दारूबंदी मंडळाच्या स्थापनेमध्येही सहभाग होता. मोहन वरठी याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याचा दारूबंदी महिला मंडळामध्ये पत्नी मंगलाचा असण्याला विरोध होता. यापूर्वीही मोहनच्या मारहाणीविरोधात तिने शहर पोलीस ठाण्यात मंडळामार्फत तक्रार दिली होती. मोहन हा दारू विक्रेत्यांकडे दारू पिण्यास गेल्यावर दारूविक्रेते त्याला त्रास देत असत. यामुळे तो घरी येऊन मंगलासोबत भांडण करून मारहाण करीत होता. दारूबंदी महिला मंडळामध्ये मंगला सक्रीय असल्यामुळे व विविध भागातील दारूबंदी महिला मंडळ स्थापनेत तिचा सहभाग असल्याने अवैधरित्या दारू विकणाऱ्यांनी मोहनच्या मदतीने तिची हत्या केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. असे असताना तपास यंत्रणा आरोपीच्या बयाणावर विश्वास ठेवून ती चारित्र्यहीन असल्याच्या दिशेने तपास करीत आहे. चौकशीकरिता केवळ परिवारातील सदस्यांनाच ताब्यात घेऊन विचारणा करण्यात येत आहे. ती चारित्र्यहीन होती व तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलीस मृतकाच्या बहिणीवर व्यक्त करीत आहेत.
या घटनेमुळे अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची हिंमत वाढली असून आता दारूविक्रेते खुलेआम महिलांना धमकावित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी महिला मंडळे स्थापन करण्याची गरज पडणे, ही बाबच लाजिरवाणी आहे; पण त्यातही मंडळाला पोलिसांचे तितकेसे सहकार्य नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आम्ही जीव धोक्यात घालून दारूविक्रेत्यास मालासह पकडून देतो; पण ते सुटून आल्यावर पुन्हा नव्या जोमाने दारूविक्री सुरू करतात. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मंगलाच्या खऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी शोधून काढत त्यास त्वरित अटक करावी आणि सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय सर्व दारूबंदी महिला मंडळातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचीही मागणी करण्यात आली.
यावेळी बिरसा मुंडा राणी दुर्गावती, जय महाकाली, जय भवानी, जय मॉँ वैष्णवी, जय मॉँ वैष्णौदेवी, जय सेवा, क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा या दारूबंदी महिला मंडळातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी माया कुमरे, अॅड. रेखा सुरोशे, पार्वती व इंदू कोकाटे, सुशिला परतेकी, गीता परतेकी, भारती मसराम, पूजा कोराम यासह शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.(शहर प्रतिनिधी)