सौरदिवे ठरताहेत कुचकामी
By Admin | Updated: November 26, 2014 23:12 IST2014-11-26T23:12:17+5:302014-11-26T23:12:17+5:30
वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरांपासून खूप दूर असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकशमान झाल्या.

सौरदिवे ठरताहेत कुचकामी
अंधाराचे सावट : अनेक दिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड
घोराड : वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरांपासून खूप दूर असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकशमान झाल्या. परंतु बॅटरीच्या सुरक्षेचा अभाव राहिल्याने अल्पावधीतच गावातील सौरदिवे आणि त्यातील बॅटरी अज्ञातांनी चोरून नेल्याने हे सौरदिवे सध्या कुचकामी ठरत असल्याची स्थिती आहे. तसेच यातील बिघाड दुरुस्त करण्याचीही व्यवस्था नसल्यानेही ते निकामी ठरत आहे.
पंचायत समितीतील ग्रामपंचायत स्तरावर गावांना सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गावातील लोकसंख्या लक्षात घेऊन वॉर्डनिहाय सौरदिवे लावण्यात आले. सौरदिव्यांच्या खांबावर सौरबॅटरीचीही व्यवस्था करण्यात आली. परंतु काही महिन्यांच्या कालावधीतच काही ठिकाणी सौरबॅटऱ्यांची अज्ञातांकडून चोरी व्हायला लागली. तर अनेक ठिकाणी यात तांत्रिक बिघाड आला.
तालुक्यांतील अनेक गावांमध्ये प्रमुख चौकात, नवीन वस्त्यात त्याचबरोबर ज्या वॉर्डामध्ये विद्युतची सुविधा नाही, अशा ठिकाणी सौरदिव्यांची उभारणी करण्यात आली. मात्र संधीचा फायदा घेत अज्ञातांकडून बॅटऱ्यांची चोरी करण्याचा सपाटा सुरू झाला. त्याचप्रकारे अनेक सौरदिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड आला. तो दुरुस्त न केल्यानेही गावांमध्ये भर चौकात अंधार पहावयास मिळत आहे. शासनाने ग्रामीण भागात सौरदिवे लावल्याने वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा कुठलाही फरक ग्रामस्थांना पडत नव्हता. अनेक सौरदिवे भर पावसातही लाईन गेल्यावर सुरू असायचे. अनेक गावात व्यवस्थित वीजपुरवठा आजही होत नाही. अशा ठिकाणी हे सौरदिवे खूपच फायद्याचे ठरत होते. परंतु बिघाड आणि चोरी या कारणाने एक चांगली व्यवस्था कुचकामी ठरू पहात आहे. यातील बिघाड दुरुस्तीसाठी वरिष्ठांनी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)