नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST2021-08-13T05:00:00+5:302021-08-13T05:00:16+5:30
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर त्यांना वाचविण्याचीही नितांत गरज आहे. यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. साप दिसल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला फोन करून बोलविले जाते. मात्र, आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. अनेक ठिकाणी गारुडी हे स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र, खऱ्या अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात.

नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साप किंवा नाग दिसताच कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत चालली असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज नागपंचमी सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. नागपंचमीला सापाला पूजले जाते. मात्र, इतर दिवशी सापाला आजही मारण्यात येत असल्याचे चित्र आहे. सापाला मारू नका तर त्याला जीवदान द्या, अशी ओरड आता सर्पमित्रांकडून केली जात आहे.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर त्यांना वाचविण्याचीही नितांत गरज आहे. यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. साप दिसल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला फोन करून बोलविले जाते. मात्र, आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. अनेक ठिकाणी गारुडी हे स्वत:चे पोट भरण्यासाठी सापांचे खेळ करतात. मात्र, खऱ्या अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही. सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती दूर करून सर्पांना जीवदान देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी सापाला पूजले जाते. मात्र, अजूनही असे काही जण आहेत जे साप दिसताच त्याला ठेचून मारतात. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापांचे निसर्गातील असलेले महत्त्व आणि सर्पदंशानंतर करण्यात येणारे प्रथमोपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार
विषारी साप :- पटेरी मण्यार, हिरवा घोणस, पोवळा, नाग, मण्यार, घोणस, फुरसे.
बिनविषारी साप :- गजरा, धामण, वाळा, कवड्या, नानेटी, कुकरी, मांडोळ, डुरक्या घोणस, गवत्या, चुळनागील, अजगर, दिवड.
साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र
सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. उंदराची प्रजनन क्षमता प्रचंड आहे. एक नर-मादी उंदराची जोडी वर्षाला ८५० पेक्षा अधिक पिलांना जन्म देते. उंदीर देशातील २५ ते ३० टक्के धान्य खातात तसेच त्यांची नासाडी करतात. अशावेळी उंदीर, घुशींच्या संख्येवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण घालण्याचे काम साप करतात. त्याचप्रमाणे पाणसाप आणि झाडावरचे साप पिकांवरील छोटे कीटक खातात. त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. हिरव्या पाठीच्या पाणसर्पाची पिले डासांच्या अळ्या व अंडी खातात यामुळे डासांच्या निर्मितीला आळा बसतो. साप हे शेतकऱ्यांचेच नव्हेतर, पर्यावरण संंतुलनाचेही काम करणारे सर्व मानवजातीचे मित्र आहेत. सापांच्या विषात विषारी द्रव्याप्रमाणे मानवास उपयुक्त असणारी पाटक द्रव्येपण असतात. सापांचे विष हे एक उपयुक्त औषध आहे.
सापाला मारणाऱ्यांनो, खबरदार!
सापांची व अन्य वन्यजीवांची हत्या करणे, त्यांच्या निवासस्थानांस हानी पोहोचविणे, त्यांची कातडी काढून विकणे वा वापरणे, त्यांना पकडणे, बंदिवासात ठेवणे, त्यांच्या अवयवांची विक्री व प्रदर्शनी करणे, तेल व अन्य औषधांकरिता अंधश्रद्धेतून त्यांची हत्या व अवयवांचा वापर करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व सुधारणा कायदा २००२ अन्वये गुन्हा आहे. हा गुन्हा करणाऱ्यास जास्तीतजास्त सात वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
साप आढळला तर...
- साप आढळून आल्यास सर्वांत आधी त्याला डिवचू नका, तो ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने त्याला जाऊ द्या, साप हा एका जागेवर फार काळ राहत नाही.
- तत्काळ सर्पमित्राला फोन करून सापाबाबतची माहिती द्या, सर्पमित्र सापाला सुरक्षित पकडून जीवदान देईल.
- सापाला मारू नका, त्याला जीवदान देण्यास मदत करा.