सर्पदंशावर होतो पुन्हा अनास्थेचा दंश

By Admin | Updated: July 19, 2014 01:34 IST2014-07-19T01:34:27+5:302014-07-19T01:34:27+5:30

जिल्ह्यात सर्पदंशावर उपयुक्त असलेले औषध

Snake bites again | सर्पदंशावर होतो पुन्हा अनास्थेचा दंश

सर्पदंशावर होतो पुन्हा अनास्थेचा दंश

जिल्ह्यात केवळ २० जणांच्या मृत्यूची नोंद : ‘अ‍ॅन्टी स्नेकव्हेनम’ लस उपलब्ध असताना रुग्णांना पाठवितात परत
रूपेश खैरी वर्धा

जिल्ह्यात सर्पदंशावर उपयुक्त असलेले औषध उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी या औषधाअभावी सर्पदंशाचे रुग्ण दगावत असल्याचे मात्र वास्तव आहे. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनास्थेपोटी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मग औषध असून त्याचा उपयोग काय? असा सवाल करण्यात येत आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात जिल्ह्यात १३ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आहे. त्यापैकी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे; मात्र वास्तव काही निराळेच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे आरोग्य सांभाळणाऱ्या २७ आरोग्य केंद्रात सर्पदंशावर आवश्यक औषध असले तरी ते येणाऱ्या रुग्णांना देण्याचे सौजन्य यावेळी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी दाखवत नाही. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय असे नऊ रुग्णालय कार्यरत आहे. या नऊ रुग्णालयात सन सन २००९-१० जे २०१३-१४ या काळात २ हजार ३२४ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी २० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात सर्पदंश झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या. यात दोघांचाही मृत्यू झाला. यात पोलोती येथे शिकणारी रोशणी सुरेश राणे (१९) हिला वेळीच औषध मिळाले नसल्याने तिचा मृत्यू झाला. मंगरूळ येथील ताराबाई चंपत ढोक (७०) या महिलेला सर्पदंश झाला असता तिला समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तिच्यावर औषधोपचार झाला नसल्याने तिचा मृत्यू झाला. असाच प्रकार सेलू तालुक्यातील रेहकी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेशी घडला. सुमीत्रा परशुराम भांडेकर (४२) हिला सर्पदंश झाल्यावर रुग्णालयात नेले मात्र औषध नसल्याचे सांगून तिला परत पाठविण्यात आले. अखेर तिच्या परिवारातील नागरिकांनी तिला गावात नेत तिच्यावर झाडपत्तीच्या औषधाचा वापर केला. सध्या तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात औषध असताना ते देण्यात का येत नाही असा नवा सवाल जिल्ह्यात समोर येत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सर्पदंशाच्या मृत्यूची नोंदच नाही
४ग्रामीण भागाची आरोग्य सेवा सांभाळण्याकरिता असलेल्या २७ आरोग्य केंद्रात सर्पदंश झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. सन २००९-१० ते २०१३-१४ च्या जून महिन्यापर्यंत सर्पदंश झालेले ९५ रुग्ण औषधोपचाराकरिता रुग्णालयात आले असले तरी त्यापैकी एकाचाही मृत्यू झाला नसल्याची नोंद आहे.
खरे कारण एकच
४जिल्ह्यात सेवाग्राम व सावंगी (मेघे) हे दोन मोठे रुग्णालय आहेत. या रुग्णालयाचा आधार घेत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा त्यांच्यावर भरोसा ठेवत आहे. शासकीस रुग्णालयात आलेल्या रुग्णांना या दोन मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याने त्यांच्याकडे मृत्यूची नोंदच होत नाही.
सलाईन मधून होतो औषधोपचार
४सर्पदंश झालेल्या रुग्णाला रुग्णालयात आणले असता त्याच्यावर औषधोपचार करताना थेट औषध न देता त्याला सलाईनच्या माध्यमातून ते देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यात अधिक घटना
४पावसाळ्याच्या दिवसात पाणी बिळात शिरल्याने अनेक सरपटणारे प्राणी बाहेर निघातात. ते स्वत:च्या संरक्षणाकरिता कुठेतरी आधार शोधतात. यात घरात, झाडाच्या बुंध्याशी, हिरवे गवत असलेल्या ठिकाणी ते लपून असतात. यामुळे बहुदा शेतात काम करीत असताना शेतकऱ्यांना व मजुरांना ते चावा घेतात. हा भाग ग्रामीण असल्याने नागरिक सर्पदंश झालेल्यांना प्राथमिक आरोग्य विभागात नेत असतात. मात्र तिथे औषधोपचार होत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंश होण्याचे प्रकार वाढत असतात. अशात रुग्णांना त्रास होणार नाही. याकरिता जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या या लसीचा जिल्ह्यात कुठेच तुटवडा नाही.
- डॉ. दुर्योधन राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा
सर्पदंशाच्या रुग्णांकरिता आवश्यक असलेली अ‍ॅन्टी स्रेक व्हेनम जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध आहे. या औषधाचा कुठलाही तुटवडा नाही.
- एन. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा

Web Title: Snake bites again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.