रस्त्यावरील झाडांची कत्तल
By Admin | Updated: February 25, 2016 02:07 IST2016-02-25T02:07:29+5:302016-02-25T02:07:29+5:30
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात व रोडवरील हिरव्याकंच वृक्षांची बेधडक कत्तल केली जात आहे.

रस्त्यावरील झाडांची कत्तल
अनिल रिठे तळेगाव (श्या.पंत)
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात व रोडवरील हिरव्याकंच वृक्षांची बेधडक कत्तल केली जात आहे. हाच प्रकार सार्वजनिक बांधकाम उपविभाग आष्टी अंतर्गत नांदपूर, चिस्तुर, आनंदवाडी, भारसवाडा, खडकी, अंतोरा, खंबीत बेलारा या रस्त्यांवरील झाडांबाबत पहावयास मिळाला. येथील बाभळीची झाडे वृक्षतोडीचा लिलाव न करताच तोडण्यात आली. एवढेच नव्हे, तर प्रकरण अगंलट येताच पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या नावाने रिपोर्ट देवून जबाबदारी झटकण्याचे निदर्शनास आले.
प्राप्त माहितीनुसार नांदपूर, चिस्तूर, आनंदवाडी, भारसवाडा, खडकी, अंतोरा, खंबीत बेलोरा या रस्त्यांवरील बाभळीच्या झाडांची १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान दिवसभर कटाई सुरू होती. या ३० कि.मी. रस्त्यावरील बाभळीची एकूण २० मोठी झाडे मुळापासून कापण्यात आली. या २० झाडांची किंमत ८० हजार रूपये आहे. गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रमणध्वनीद्वारे दिली. मात्र सुट्टी असल्याने अधिकाऱ्यांनी सारवासारव केली. प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच २० व २२ फेब्रुवारी रोजी शाखा अभियंता हरिष परमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून अज्ञात व्यक्तीने सां.बा. विभागाच्या हद्दीतील बाभळीची झाडे तोडल्याची तक्रार आष्टी व तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना व तळेगाव पोलिसांत करण्यात आली. अज्ञात व्यक्तीचा शोध घेवून तात्काळ कारवाई करावी अश्या सूचनाही दिल्याचे तक्रारीत नमूद केले. बांधकाम विभाग तक्रार देवून स्वत:ची जबाबदारी झटकून टाकण्यात यशस्वी झाला असला तरी मूळ प्रकरण वेगळेच असल्याचे सांगण्यात येत आहे. पण गोपनीय माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यांने बाभळीची झाडे तोडण्यासाठी मौखिक परवानगी दिल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
बाभळीची झाडे शासकीय जागेत असल्याने त्याची देखरेख करण्याची जबाबदारी शाखा अभियंत्यांकडे आहे. सदर अभियंता आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारातून कारभार करीत आहे. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिबंध घालण्याची मागणी चिस्तूर ते खंबीत बेलोरा या मार्गावरील गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
या मार्गावर बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. पण या ना त्या कारणामुळे सतत सुरू असलेल्या वृक्ष कटाईमुळे हे रस्ते ओकेबोके दिसू लागले आहेत. गत महिन्यापासून या मार्गावरील हिरवी झाडे कापण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नव्हे तर कवकार झाडे कापली जावी यासाठी मशीनचा बेधडक वापर केला जात आहे.
सध्या इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. इमारतीसाठी लाकूड वापरण्यात येत नसले तरी निंब, बाभूळ व आमवृक्षांची लाकडे इतर अनेक कामासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे दरही चांगला मिळतो. वृक्षांची कटाई करणारे हे कंत्राटदार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रस्त्यावर पडलेली किंवा वाकलेली झाडे कमी किंमतीत घेवून सोबसोबत उभी असलेली झाडेही मशीनद्वारे तोडूने तीही पडल्याचा भास निर्माण करतात.