रस्त्यालगतच्या तीन सार्वजनिक वृक्षांची कत्तल
By Admin | Updated: November 15, 2016 01:33 IST2016-11-15T01:33:09+5:302016-11-15T01:33:09+5:30
शासन, प्रशासनाकडून वृक्ष लागवडीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात स्थानिक स्वराज्य

रस्त्यालगतच्या तीन सार्वजनिक वृक्षांची कत्तल
नागरिकांत आश्चर्य : कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : शासन, प्रशासनाकडून वृक्ष लागवडीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह शिक्षकांवरही वृक्ष लागवडीचा भार असतो; पण शहरात शिक्षकांनीच वृक्षतोड केल्याचे समोर आले आहे. याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद कॉलनीतील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जि.प. कॉलनी आर्वी रोड येथील नागरिक प्रमोद भागवतकर हे ३५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांनी ग्रा.पं. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने घरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा १४ वृक्षांची लागवड सात ते आठ वर्षांपूर्वी केली होती. त्यांचे संगोपनही ते करीत आहेत. अशातच गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ७-८ वर्षांचे मोठे करंज प्रजातीचे दोन वृक्षांची आशिष अजय देशमुख यांनी कत्तल केली. शिवाय शुक्रवारी पुन्हा एक झाड तोडले. त्यांनी परिसरातील तीन वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जि.प. कॉलनीतील रहिवासी हेमंत जुनघरे, हे जि.प. प्राथमिक शाळा धामणगाव (वाठोडा) येथे शिक्षक आहे. ते वारंवार वृक्षतोड करीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तोडलेल्या झाडांच्या फांद्या तेथेच गोळा करून ठेवत असून वाळल्यानंतर जाळली जात आहेत. आगीमुळे उर्वरित वृक्षही करपत असल्याचे दिसून येत आहे.
शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला २०१२-१३ मध्ये ४२.९५ लाख, २०१३-१४ मध्ये ४०.२५ लाख इतके उद्दिष्ट दिलेले होते. यात ग्रामविकास विभागाला २०१२-१३ मध्ये १९.९५ लाख व २०१३-१४ मध्ये १८.६३ लाखांचे उद्दिष्ट होते. यापैकी २४.६२ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. वनमहोत्सव कालावधीत १ जुलै २०१६ मध्ये एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात वर्धा जिल्ह्यात संपूर्ण यंत्रणेने ७ लाख ६१ हजार ९९४ इतकी वृक्ष लागवड केली आहे. सदर रोपांच्या संगोपनासाठी प्रत्येक झाडाला १२०७.९५ इतका खर्च येत आहे. असे असताना भागवतकर यांनी ७-८ वर्षांपूर्वी बेरोजगार असताना पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक बांधिलकी समजून झाडांवर व्यक्तीश: खर्च केला. यातून त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला; पण नागरिकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता सदर झाडांची कत्तल केली आहे. आशीष देशमुख व हेमंत जुनघरे हे जि.प. चे शिक्षक असताना त्यांनी शासनाची परवानगी न घेता हे कृत्य केले. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भागवतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)