खसऱ्याच्या नावावर सागवान वृक्षांची कत्तल
By Admin | Updated: July 16, 2014 00:20 IST2014-07-16T00:20:56+5:302014-07-16T00:20:56+5:30
पर्यावरण व प्रदूषणावर मात करण्यासाठी शासन शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवित आहे. लावलेली झाडे जगविण्यासाठी उन्हाची तमा न बाळगता मनरेगाच्या मजुरांनी पाणी दिले.

खसऱ्याच्या नावावर सागवान वृक्षांची कत्तल
वर्धा : पर्यावरण व प्रदूषणावर मात करण्यासाठी शासन शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवित आहे. लावलेली झाडे जगविण्यासाठी उन्हाची तमा न बाळगता मनरेगाच्या मजुरांनी पाणी दिले. या वृक्षांची देखभाल व संरक्षण करण्याऐवजी वनविभागाचे अधिकारी शेतातील सागवान वृक्ष कटाईच्या नावाखाली जंगलातील सागाची झाडे कापण्याला प्रोत्साहन देत आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आष्टी (श.) वनपरिक्षेत्रांतर्गत मौजा थार जंगलाला लागून एका आदिवासी शेतकऱ्याची शेती आहे. या शेतात मोठ-मोठी सागाची झाडे होती. शेताला लागून वनविभागाची हद्द आहे. या विस्तीर्ण परिसरात घनदाट जंगल आहे. याचाच फायदा घेत संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने एका ठेकेदाराला हाताशी धरून आदिवासी शेतकऱ्याचा लाखो रुपयाचा खसरा थोड्याफार भावात विकत घेतला आणि लागलीच कटाई सुरू केली. कापलेल्या झाडांची विल्हेवाट त्वरित लावण्यात आली. सदर प्रकार रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी वनविभागाच्या आष्टी कार्यालयात चौकशी केली असता कुणीही कर्मचारी माहिती देण्यास तयार नव्हता़ येथील अधिकाऱ्यांची नागपूरला बदली झाली. त्यांचा प्रभार तळेगाव (श्या.पंत) येथील अधिकाऱ्यांकडे आहे. संबंधित अधिकारी मनमानी करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ यामुळे खसऱ्याच्या गोंडस नावाखाली लाखोंची वनसंपदा नष्ट केली जात असल्याचे दिसते़
कापलेल्या सागवान वृक्षांची काहीच प्रमाणात वाढ झाली तर काही वृक्ष टोलेजंग आकारचे होते़ नियमांची पायमल्ली करून वृक्षकटाईला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रकरणाची लेखी तक्रार निवेदनाद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयाकडे करण्यात आली आहे. सोबतच मौजा पार्डी, माळेगाव, सारवाडी, वर्धमनेरी या परिसरात वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे. गौणखनिजाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे़ प्राण्यांची शिकार करून मोठ्या भावात विकल्या जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. मनरेगा अंतर्गत असलेल्या रोपवाटिकेवर संबंधित अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अवाढव्य खर्च कागदोपत्री दाखविल्याचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. सदर खर्चाची माहिती अनेकांनी माहितीच्या अधिकाऱ्यांना मागण्यात आली; पण संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी हेकेखोर वृत्तीने वागून माहिती देण्यासही नकार देत असल्याचे सांगण्यात आले आहे़
या संपूर्ण प्रकरणांची त्वरित चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व वृक्षतोडीबाबत जाब विचारावा, अशी मागणी नागरिकांनी वरिष्ठांकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)