बाजार चौकातील सहा दुकाने फोडली
By Admin | Updated: August 14, 2015 02:19 IST2015-08-14T02:19:09+5:302015-08-14T02:19:09+5:30
स्थानिक आठवडी बाजार चौक तसेच ठाकरे मार्केट परिसरातील सहा दुकाने बुधवारी रात्री फोडण्यात आली.

बाजार चौकातील सहा दुकाने फोडली
४० हजार रोख व साहित्य लंपास : व्यापारी वर्गात चोरट्यांची दहशत
देवळी : स्थानिक आठवडी बाजार चौक तसेच ठाकरे मार्केट परिसरातील सहा दुकाने बुधवारी रात्री फोडण्यात आली. यामध्ये औषधीची तीन दुकाने, डेली निड्स, रेडिमेट व जनरल स्टोअर्स आदींचा समावेश आहे. संततधार पावसामुळे सुनसान झालेल्या वातावरणाचा फायदा घेवून मध्यरात्रीच्या दरम्यान या चोऱ्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या दुकानांमधून एकूण ४० हजारांची रोख व काही साहित्य लंपास करण्यात आले आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्ग धास्तावला आहे. पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला काही अंतरावर या चोऱ्या झाल्याने यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने रात्री ८ वाजताच्या दरम्यान गावातील सर्व रस्ते सुनसान होत आहे. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी बाजार मार्केट मधील अजय देशमुख यांच्या मालकीचे दत्तकृपा मेडिकल, विजय टावरी यांचे विजय मेडिकल, संजय कनेर यांचे संजय मेडिकल, वामन शिल्पे यांचे लोकेश डेली निडस, धनराज घुबडे यांचे भास्कर रेडिमेड, बाबा उमरे यांचे श्रीनाथ जनरल स्टोअर्स आदी दुकाने फोडण्यात आली. कुलूपांच्या कोंड्याना लोखंडी रॉडच्या माध्यमातून तडकवून या चोऱ्या करण्यात आल्या. पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेले दिनेश वैद्य यांचे मोबाईलचे दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. एकाच रात्री सहा ते सात दुकाने फोडल्याची ही पहिली घटना आहे. काही दिवसापूर्वी वस्ती परिसरात ३ ते ४ चोऱ्या होवून रोख रक्कम लंपास करण्यात आली. बोपापूर (दिघी) येथील महिलेला तिच्या राहते घरी भरदुपारी लुटण्यात आले. या सर्व घटनांचा तपास थंडबस्त्यात आहे.(प्रतिनिधी)
पोलीस गस्त नाही
रात्रीच्या वेळेला पोलिसांची गस्त कमी झाली आहे. एखाद वेळेस काहीतरी पोलीस गाडी फिरवून वेळ मारून नेली जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हान ठरल्या आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे या भागात बाहेरील लोकांचा भरणा आहे. या सर्वांची माहिती पोलीस ठाण्यात असणे गरजेचे आहे.