प्रतिबंधित तंबाखू विक्री प्रकरणी सहा महिने सक्तमजुरी
By Admin | Updated: October 29, 2016 00:50 IST2016-10-29T00:50:40+5:302016-10-29T00:50:40+5:30
अन्न सुरक्षा व मानद कायद्यांतर्गत सुगंधित तंबाखू पान मसाला इत्यादी अन्नपदार्थ विक्री, निर्मिती,

प्रतिबंधित तंबाखू विक्री प्रकरणी सहा महिने सक्तमजुरी
नव्या कायद्यानुसारचा पहिलाच निर्णय
वर्धा : अन्न सुरक्षा व मानद कायद्यांतर्गत सुगंधित तंबाखू पान मसाला इत्यादी अन्नपदार्थ विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक करणे प्रतिबंधित असताना पुलगाव येथील श्यात जर्दा भंडार येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित साठ मिळून आला. या प्रकरणी दुकान मालक श्यामलाल गणेशलाल जैस्वाल (६०) रा. रामनगर, पुलगाव, ता. देवळी, याला सहा महिने मजुरी व एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा प्रस्तावित आहे. सदर निर्णय वर्धा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी दिला.
याबाबत हकीकत अशी की, अन्न व औषध प्रशासन, येथे तत्कालीन अन्न सुरक्षा अधिकारी, एस.जी. बोयेवार यांनी ३ आॅक्टोबर २०१२ रोजी पुलगाव येथील श्याम जर्दा भंडार, येथे कारवाई करीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखु जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक श्यामलाल गणेशलाल जैस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.
कारवाई करणारे अधिकारी बोयेवार यांची बदली झाल्यामुळे त्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी केली. जप्त केलेला साठा प्रतिबंधित असल्यामुळे धाबर्डे यांनी सदर साठा पदावधीत अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न), वर्धा यांच्या समक्ष पुढील आदेशार्थ सादर केला होता. सदर प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष आले असता सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. स्थुल यांनी शासनाची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एस.एन. माने-गाडेकर यांनी आरोपीला सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा प्रस्तावित केली आहे.(प्रतिनिधी)