विनयभंगप्रकरणी सहा महिने कारावास
By Admin | Updated: July 9, 2015 02:08 IST2015-07-09T02:08:17+5:302015-07-09T02:08:17+5:30
विनयभंगप्रकरणी वसंता बापुराव मोहर्ले (६०) रा. हिंगणी, तह. सेलू जि. वर्धा या आरोपीला कलम ३५४ अंतर्गत सहा महिने कठोर कारावास ...

विनयभंगप्रकरणी सहा महिने कारावास
वर्धा : विनयभंगप्रकरणी वसंता बापुराव मोहर्ले (६०) रा. हिंगणी, तह. सेलू जि. वर्धा या आरोपीला कलम ३५४ अंतर्गत सहा महिने कठोर कारावास तसेच हजार रुपये दंडाची शिक्षा समीर डकर जिल्हा न्यायाधीश - २, वर्धा यांनी सुनावली.
१० जानेवारी २०१३ रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान आरोपी वसंता मोहर्ले याने एका २० वर्षीय महिलेला जळावू लाकूड देण्याचे आमिष देवून पोकळे यांच्या शेताजवळील नाल्याकडे नेले व तिचा विनयभंग केला. घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी पीडितेने सेलू पोलीस स्टेशन येथे नोंदविली. तक्रारीच्या आधारे वसंता मोहर्ले विरुद्ध कलम ३७६, ५११, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एल. के. हांडे यांनी केला व तपासाअंती आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिद्ध करण्यासाठी एकूण सहा साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. साक्षी पुराव्यांच्या आधारे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेता न्यायाधीश यांनी मोहर्ले यास सहा महिने कठोर कारावास तसेच हजार रुपये दंडा ठोठावला.(शहर प्रतिनिधी)
धनादेश अनादरप्रकरणी १८ महिने कारावास
श्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखा वर्धाला फसवणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १८ महिने कारावास आणि ३ लाख ७५ हजार रुपयाचा दंड सहावे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे यांनी ठोठावला. मोहन अशोकराव ठाकरे याच्या विरूद्ध दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणी हा आदेश दिला.
मोहन ठाकरे रा. वर्धा याने ट्रॅक्टर खरेदीसाठी फिर्यादी कंपनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. च्या वर्धा शाखेतून २ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड करण्याकरिता ठाकरे याने फिर्यादी कंपनीस ३ लाख ७० हजार ५२८ रुपयांचा धनादेश दिला. सदर धनादेश कंपनीने वटविण्यासाठी बँकेत टाकला असता ठाकरे याच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर फिर्यादी कंपनीने धनादेश अनादरित झाल्याबाबत आरोपी विरूद्ध प्रकरण न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात फिर्यादी कंपनीद्वारे तीन साक्षदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाकडून दाखल साक्षपुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे मोहन ठाकरे याला दोषी ठरवून सदर दंड व शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही देण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी कंपनीतर्फे अॅड. अमोल कोटंबकर यांनी काम पाहिले.