आष्टीतील सहा मोठ्या पुलांनी गाठली शंभरी
By Admin | Updated: August 5, 2016 02:10 IST2016-08-05T02:10:39+5:302016-08-05T02:10:39+5:30
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शहिदभूमीतील सहा मोठ्या पुलांनी शंभरी गाठली आहे,

आष्टीतील सहा मोठ्या पुलांनी गाठली शंभरी
राज्यमार्गच जीवघेणा : सातत्याने दुर्लक्ष
अमोल सोटे आष्टी (शहीद)
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शहिदभूमीतील सहा मोठ्या पुलांनी शंभरी गाठली आहे, तर लहान २४ पूल अखेरच्या घटका मोजत आहे. केंद्र तथा राज्य शासन याकडे गांभीर्याने घेताना दिसत नाही. एखादी घटना घडल्यास प्रशासन थातुरमातूर उपाययोजना करून मोकळे होते. त्यामुळे सामान्यांच्या जीविताशी खेळ मांडला जात असल्याचे बोलल्या जात आहे.
नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर वर्धा-अमरावती जिल्ह्याची सिमा म्हणून जोडलेल्या खडका पुलाची वयोमर्यादा संपली आहे. पाच वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले होते. यावेळी जुना पूल कायम ठेवून दुसऱ्या बाजुने नवीन पूल बांधण्यात आला. त्यामुळे एका बाजुची वाहतूक जुन्याच पुलावरून होत आहे. कुठल्याही क्षणी येथे दुर्घटना घडू शकते. वर्धा नदीच्या पात्रात अवाढव्य जागेत हा महाकाय पूल आपली वयोमर्यादा पूर्ण करून चुकला आहे.
आष्टी-साहुर-द्रुगवाडा राज्यमार्ग २४४ वर द्रुगवाडा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रातील पूल वर्धा-अमरावती जिल्ह्याची सीमा जोडतो. वरूड, मध्यप्रदेश, मुलताई, बैतुलकडे ये-जा करणारी शेकडो वाहने दिवसरात्र बिनधास्तपणे धावत आहे. या पुलाला १२५ वर्षे पूर्ण झाली आहे. कुठल्याही क्षणी हा पूल कोसळण्याचा धोका आहे. मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात दोनदा पत्रव्यवहार केला आहे. पण राज्यशासन दखल घ्यायला तयार नाही. पूल वाहतुकीकरिता सक्षम असल्याचा शेरा देवून शासन जबाबदारीतून मोकळे झाले आहे.
आष्टी-मोर्शी रस्त्यावर अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य गेटसमोरील पूलही मुदतबाह्य झाला आहे. १९४० साली या पुलाचे काम करण्यात आले होते. वर्धा-अमरावती जिल्ह्याला जोडणारा हा पूल बारमाही धरणाच्या पाण्यात असल्यामुळे क्षतीग्रस्त झाला आहे. दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक आणि धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाण्याचा आनंद लुटण्यासाठी येणारे हजारो पर्यटक याच पुलावर उभे राहतात. अप्पर वर्धा धरण विभागाने पुलाची दुरूस्ती केलेली नाही. या पुलाशेजारी पर्यायी दुसरा पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग वेळकाढू धोरण ठेवत आहे.
आष्टी-परसोडा मार्गावर लेंडी नदीवरील पुलानेही वयोमर्यादा पार केली आहे. जीर्ण झालेल्या पुलावरून प्रवासी वाहतूक करीत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहून वाहतूक ठप्प होते. येथे नवीन पूल तात्काळ बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. याच मार्गावर आणखी दुसरा पूल परसोडा गावाच्या अलीकडे आहे. दोन्ही बाजूला उंच भाग असल्याने पूल खोलात भागात आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक प्रभावित होते. आष्टी-साहुर रस्त्यावर धाडी गावाच्या अलीकडे जामचा पूल आहे. या पुलाची वयोमर्यादाही संपली आहे.
२४ छोटे पूल धोक्याचे
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेले आष्टी तालुक्यातील २४ लहान पूल नव्या बांधकामाच्या प्रतिक्षेत आहे. निधी नसल्याच्या कारणावरून बांधकामाकडे सतत चालढकल केली जात आहे. या पुलांवरून पाणी वाहत असल्याने पावसाळ्यात वाहतूक प्रभावित होते. पुलावरून पाणी उतरेपर्यंत वाट पाहावी लागते. या २४ लहान पुलांमध्ये - तळेगाव-आष्टी रस्त्यावर ३ पूल, आष्टी-साहूर रस्त्यावर ३, आष्टी-थार रस्त्यावर ४, आष्टी-परसोडा मार्गावर ३, चिस्तूर-भारसवाडा-खडकी मार्गावर ४, खडकी-खंबीत बेलोरा- ४, साहूर-माणिकवाडा मार्गावर २ तर साहूर-वडाळा मार्गावरील एका पुलांची वयोमर्यादा संपली आहे.