सिंभोरा फुल्ल; १८ गावांना सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: August 4, 2016 00:33 IST2016-08-04T00:33:32+5:302016-08-04T00:33:32+5:30
मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला. बुधवारी सकाळी ८ वाजता प्रकल्पाचे सर्व १३ गेट ५० सेमीने उघडण्यात आले.

सिंभोरा फुल्ल; १८ गावांना सतर्कतेचा इशारा
वर्धा नदीची दुथडी : निम्न वर्धा प्रकल्पाची दारेही उघडली
वर्धा/आष्टी (श.) : मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला. बुधवारी सकाळी ८ वाजता प्रकल्पाचे सर्व १३ गेट ५० सेमीने उघडण्यात आले. परिणामी, सायंकाळी ७ वाजता निम्न वर्धा प्रकल्पाची सर्व ३१ गेट ३२ सेमीने उघडण्यात आली. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पाने पातळी गाठली. जिल्ह्यावर प्रभाव करणारा मोठा प्रकल्प असल्याने वर्धा नदीवरच असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाची दारेही उघडण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पातून ७८५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून काठावरील गावांना अतिदक्षता व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा जलाशयाची पातळी ३४४.७५ मी. असून ४१६.८५ दलघमी जलसाठा झाला. पर्जन्यमानाचा अंदाज सरसरीपेक्षा कमी वेळेत पूर्ण झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी १३ गेट उघडण्यात आले होते. मंगळवारी तीन तर बुधवारी सर्व गेट ५० सेमीने उघडल्याचे अमरावती जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी सांगितले. बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत गावांना सतर्क करण्यात आले. पर्यटकांची गर्दी वाढल्याने ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी ५०० मीटर परिसरात पोलीस बंदोबस्त लावला आहे. धरणाजवळील पुलाच्या लेव्हलने पाणी नदीच्या पात्रात विसर्ग होत आहे. बुधवारी दिवसभर पाऊस असल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे.(कार्यालय/तालुका प्रतिनिधी)