सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच पायउतार
By Admin | Updated: June 15, 2016 02:32 IST2016-06-15T02:32:57+5:302016-06-15T02:32:57+5:30
सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा अरुण येसनकर व उपसरपंच मंगेश कांबळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच पायउतार
गैरप्रकार भोवला : १५ विरूद्ध २ मतांनी सरपंचाविरूद्ध ठराव पारित
वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा अरुण येसनकर व उपसरपंच मंगेश कांबळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबत मंगळवारी दुपारी २ वाजता सिंदी मेघे ग्रा.पं. कार्यालयात तहसीलदार राहुल सारंग यांच्या अध्यक्षतेत विशेष सभा घेण्यात आली. यात १५ विरूद्ध २ मतांनी सरपंचावरील तर १४ विरूद्ध २ मतांनी उपसरपंचावरील अविश्वास ठराव पारित करण्यात आला. ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता केली जाणारी कामे आणि गैरप्रकार सरपंच, उपसरपंचांना भोवला, अशी चर्चा आहे.
सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीचा कारभार गत काही दिवसांपासून ढेपाळला होता. ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, ग्रा.पं. ची दिशाभूल करून रकमांचा अपहार करणे, मनमानी कारभार करणे आदी कारणे समोर करीत तब्बल १५ ग्रा.पं. सदस्यांनी सरपंच आणि उपसरपंचांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. याबाबत मंगळवारी तहसीलदार राहुल सारंग यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेत ग्रा.पं. सदस्य विजय महेशगौरी, माधुरी मुडे, अमरदिप कांबळे, रेणुका कुबडे, अंजूताई घोडेस्वार, उत्कर्ष देशमुख, मनोज करडे, ज्योत्सना तेलरांधे, मनीषा महाकाळकर, चंदा कुभलकर, गौरी डेहनकर, श्याम मोहोड, सुप्रिया मोहोड, विवेक ढगे आणि अभिजीत भेंडाळे या १५ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर सरपंच सुषमा येसनकर व उपसरपंच मंगेश कांबळे यांनी विरोधात मतदान केले. सरपंच पद खुला प्रवर्ग महिला राखीव असल्याने एक तृतियांश म्हणजे १३ मते विरोधात गरजेची होती; पण १५ सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने अविश्वास ठराव पारित करण्यात येत असल्याचे तहसीलदार सारंग यांनी जाहीर केले.
यानंतर उपसरपंच मंगेश कांबळे यांच्यावरील अविश्वासावरही त्याच आरोपांखाली चर्चा करून मतदान घेण्यात आले. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने १४ सदस्यांनी मतदान केले तर घोडेस्वार तटस्थ राहिल्या. विरोधात दोन मते पडल्याने उपसरपंचावरही १४ विरूद्ध २ मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. परिणामी, सरपंच व उपसरपंचांना पायउतार केल्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी जाहीर केले.(कार्यालय प्रतिनिधी)