फुटक्या नाल्या, डबके अन् धुळीचे रस्ते
By Admin | Updated: May 20, 2016 01:49 IST2016-05-20T01:49:58+5:302016-05-20T01:49:58+5:30
लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरूवारी सिंदी(मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डेहनकर ले-आऊट,...

फुटक्या नाल्या, डबके अन् धुळीचे रस्ते
लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरूवारी सिंदी(मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डेहनकर ले-आऊट, चिंतामणी नगरी, बोभाटे ले-आऊट, झाडे ले-आऊट, मारोतीभाऊ समाधी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात ग्रा.पं. प्रशासनाकडून सुविधा दिल्या जात नसल्याची ओरडच नागरिकांकडून करण्यात येत होती. गत कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या, नव्याने बांधलेल्या फुटक्या नाल्या, कच्चे रस्ते, त्यातही मुरूम व गिट्टी वर आलेली आणि सांडपाण्याचे डबके या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
परिसरात काही भागात नाल्यांचे बांधकाम करण्यात आले; पण निकृष्ट दर्जामुळे अनेक नाल्या फुटल्या आहेत. काही भागात सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्याच करण्यात आलेल्या नाही. यामुळे मोकळ्या जागेत सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. शिवाय डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील अंगणवाडीही डबक्यातच बांधण्यात आली आहे. अंगणवाडीच्या मागील भागात सांडपाणी साचले असून झुडपे वाढली आहेत. या अंगणवाडी बालकांवर कसे संस्कार केले जात असतील, हा प्रश्नच आहे. पावसाळ्यात टेकडीवरील पाणी सखल भागात येत असल्याने स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसरात डबके साचते. परिणामी, चिखल होऊन नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होते.
या भागातून सिंदी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाला मोठ्या प्रमाणात कर मिळतो; पण त्या तुलनेत सुविधा पुरविल्या जात नाहीत. रस्त्याची दुरवस्था, नाल्या फुटलेल्या आणि कचऱ्याचे साम्राज्य यामुळे आरोग्याचा प्रश्न असतो. खुल्या जागांचाही विकास करण्यात आलेला नाही. यामुळे चिमुकल्यांना खेळण्याकरिता उद्यानच नाही. सांडपाण्याचा निचरा हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचेही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.