व्यापाऱ्यांचा बंद : शहिदांच्या दर्शनाकरिता सारेच आतूर
By Admin | Updated: June 2, 2016 00:39 IST2016-06-02T00:39:49+5:302016-06-02T00:39:49+5:30
पुलगाव दारुगोळा भांडारात सोमवारी झालेल्या स्फोटात शहरातील पाच जवान शहीद झाले.

व्यापाऱ्यांचा बंद : शहिदांच्या दर्शनाकरिता सारेच आतूर
पुलगावात नीरव शांतता
प्रशांत हेलोंडे/देवकांत चिचाटे पुलगाव
पुलगाव दारुगोळा भांडारात सोमवारी झालेल्या स्फोटात शहरातील पाच जवान शहीद झाले. शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. शहरातील वातावरणात शहिदांप्रती आत्मीयता दर्शविणारी शांताता दिसून येत होती. पुलगावकराना शहिदांच्या अंतिम दर्शनाची ओढ लागली होती. व्यापारी प्रतिष्ठाने बंद असताना शहिदांची प्रतीक्षा करणारी प्रत्येक नजर दारूगोळा भांडाराच्या गेटकडे खिळली होती. पुलगाव शहरात बुधवारी सकाळपासून नीरव शांतता असल्याचे चित्र होते.
शहिदांच्या आत्मीयतेने पुलगावकर ओतप्रोत
पुलगाव : शहरात शहिदांच्या आत्मीयतेने पुलगावकर ओतप्रोत झाल्याचे चित्र शहरात निर्माण झाले होते. प्रत्येकाला शहिदांच्या अंतिम दर्शनाची आस होती. यामुळेच दारूगोळा भांडाराच्या मुख्य द्वारावर नागरिकांनी गर्दी होती. शाहिदांना श्रद्धांजली म्हणून मोठे व्यापारी व किरकोळ दुकानदारांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तरित्या बंद ठेवली. शहिदांना आदरांजली वाहण्यात आपण मागे राहू नये, अशी जणू शर्यतच लागल्याचे चित्र होते.
शहरातील प्रत्येक गल्ली बोळात नागरिक घराबाहेर निघून अंत्ययात्रा कधी आहे, मृतदेह कुटुंबीयांच्या हवावी केले का, किती जण शहीद झाले, आदी प्रश्न करीत होते. अमोल येसनकर यांचे निवासस्थान असलेल्या कवठा (रेल्वे) येथेही नागरिकांनी शहीद अमोलच्या अंत्यदर्शनाकरिता गर्दी केली होती. असेच चित्र हरिराम नगर, गाडगेनगर आणि गुलजारी प्लाट परिसरात होते. प्रत्येकाची नजर शहीद जवांनाना अखेरचे पाहण्यासाठी आसुसली होती. नेहमी नागरिकांनी गजबजून राहात असलेल्या गांधी चौक, स्टेशन चौक आणि नाचणगाव नाका चौकांत शांतता पसरली होती. पुलगाव शहरातील जवान यापूर्वी शहीद झाले नाही, असे नाही पण आजचा दिवस प्रत्येक पुलगावकराच्या मनाला चटका लावणारा ठरला. एकाच वेळी शहरातील पाच जवान शहीद झाले. यातील तिघांचे मृतदेह सन्मानासह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या शहीदांवर एकाच वेळी शासकीय इतमामात पंचधरा मोक्षाामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन शहीदांवर अंत्यसंस्कार होण्याची ही पहिलीच घटना असल्याने समाजमन सुन्न होते.
आजचा दिवस पुलगावकरांसाठी विलक्षण होता. दिवसभर शहिदांच्या अंत्यदर्शानाची प्रतीक्षा, मृतदेह मिळाल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश, उपस्थितांची स्तबता, दाटूंन आलेला कंठ आणि आपाल्यातील एक देशासाठी शहीद झाला ही भावना हे भाव प्रत्येकाच्या नजरेत स्पष्ट दिसत होते. शहरातील नागरिकांनी बुधवारी अत्यंत जड अंत:करणाने शहिदांना अखेरचा सलाम करीत आपला भाव प्रकट केला. नागरिकांकरिता थंड पाण्याची सोय
थंड पाण्याची सोय
शहिदांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरिता शहरासह परिसरातील नागरिक पुलगाव शहरात दाखल झाले होते. नाचणगाव नाका ते पंचधारा मोक्षधाम मार्गावर दुतर्फा नागरिक अंतयात्रेची प्रतीक्षा करीत होते. नागरिकांकरिता प्रशांत राऊत यांनी स्वयंस्फूर्तरीत्या थंड पाण्याची व्यवस्था केली होती.
रसुलाबाद येथे कॅन्डल मार्च
शहिदांच्या सन्मानार्थ रसुलाबाद येथे युवकांनी कँडल मार्च काढला. शहीद अमर रहे च्या गजरात शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. अमर शहीद अमर रहे, भारत माता की जय म्हणत ग्रामस्थ यात सहभागी झाले होते.
शहरवासीयांची हुरहूर कायमच
पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात झालेल्या स्फोटात शहरातील पाच फायरमॅनचा मृत्यू झाला. यातील अमोल येसनकर, अमित दांडेकर, लीलाधर चोपडे तिघांचे मृतदेह दिले तर बाळू पाखरे आणि प्रमोद मेश्राम यांचे मृतदेह अद्यापही देण्यात आलेले नाहीत. यामुळे शहराची हुरहूर गुरुवारीही कायम राहणार असल्याचे चित्र आहे.