गिरड येथील श्रीराम देवस्थानाचे तिसऱ्या शतकात पदार्पण
By Admin | Updated: April 4, 2017 01:20 IST2017-04-04T01:20:18+5:302017-04-04T01:20:18+5:30
१३३ वर्षांचा इतिहास असलेली येथील रामजन्म घोडायात्रा विदर्भात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते.

गिरड येथील श्रीराम देवस्थानाचे तिसऱ्या शतकात पदार्पण
१३३ वर्षांपासूनचा रामजन्म व ऐतिहासिक घोडायात्रा ठरते हिंदू- मुस्लीम एकतेचे प्रतिक
लालसिंग ठाकूर गिरड
१३३ वर्षांचा इतिहास असलेली येथील रामजन्म घोडायात्रा विदर्भात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते. येथील राम मंदिराला २०१५-२०१६ मध्ये दोन शतक पूर्ण झाले. यंदाच्या रामनवमीपासून तिसऱ्या शतकाला प्रारंभ होत आहे.
सीताराम महाराजानी भ्रमंतीदरम्यान या घोडा यात्रेचा प्रारंभ केल्याची आख्यायिका आहे. या वर्षीच्या घोडा यात्रेचे हे १३३ वे वर्षे आहे. या प्राचीन यात्रेला हिंदु-मुस्लीम भाविकांची गर्दी उसळते. दोन दशके पूर्ण करणाऱ्या राम मंदिरच्या जागेवर त्याकाळी पैठण येथून आलेले सीताराम महाराज यांचा मठ होता. नंतर याच मठाचे रूपांतर राममंदिरात झाले. त्या मठात श्रीराम-लक्ष्मण-सीतेची मूर्ती विराजमान झाली. दरम्यान ४० वर्षांनी सीताराम महाराजांनी देह त्यागला. त्यानंतर मठाची जबाबदारी रामकृष्ण महाराज यांनी घेतली. ३० वर्षांची त्यांनी समाधी घेतली. यानंतर बाजीराव महाराज यांनी मठ सांभाळला. त्यांनी जुन्या झोपडीत श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्यासाठी मंदिरच्या जमिनीच्या उत्पन्नाचा आधार घेतला. १९९८ मध्ये त्यांनी समाधी घेतली. यानंतर त्यांचे शिष्य मनसाराम महाराज यांनी काम सांभाळले. १० वर्षांनी त्यांनी देह त्यागला. त्यानंतर रूपराम महाराज, नंतर अनंतदास महाराज, रामदास शास्त्री यांनी सांभाळले.
१९६६ पासून या मंदिराची देखरेख व कामकाज विश्वस्त मंडळ सांभाळत आहे. देवस्थान जवळ असलेली २०० एकर जमीन नागपूरातील वाडा, वडकी (खैरी) येथील जमीन हिंगणघाटचे मंदिर हे उत्पन्नाचे स्त्रोत्र आहे. सन १८८५ मध्ये घोडायात्रा सुरू झाली. या यात्रेकरिता वापरण्यात येत असलेला घोडा चंद्रपूर जिल्ह्यातील एका कलावंताने लाकडापासून बनवला. गत १३३ वर्षांपासून हाच रथ वापरला जातो. या घोडायात्रेला विदर्भातून रामभक्त येत शेख फरीद बाबाचेही दर्शन घेत असतात.
मंदिराला तब्बल ६५ खांब
नागपूर-हैद्राबाद महामार्गावर जाम येथून २१ कि़मी. अंतरावर उमरेड मार्गावर सदर देवस्थान आहे. प्राचीन इतिहास असलेले गिरडचे राममंदिर ६५ खांबावर डौलदार उभे आहे. आजही मंदिर नविनच वाटते. उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना म्हणून या देवस्थानची ओळख आहे. ती मोठे दरवाजे, २०० एकर जमीन, लाकडी घोडा, रथ, श्रीरामाची विलोभनीय मूर्ती, पहारेकरी, पालखी आजही जैसे थे आहे. याच देवस्थानचा नागपुरात मोठा वाडा आहे. त्या काळात ६०० एकर जमीन दानात मिळाली. मंदिराकडे सध्या २५० गुरे असून गोशाळा आहे. व्यायाम शाळा सोबत आयुर्वेदिक दवाखाना आहे. या व्यतिरिक्त इतर संपत्तीही आहे. वर्धा जिल्ह्यातील प्राचीन इतिहासाचे साक्ष म्हणून देवस्थानाला व राम-घोडा यात्रेकडे आजही पाहल्या जाते. या मंदिराचे विश्वस्त बबन दाभणे, वसंत पर्बत, प्रभाकर दाते, सुधाकर बाकडे, संदीप शिवणकर, शालिक बाडे, टिपले, ब्राह्मणवाडे, व्यवस्थापक सुरेश गिरडे या मंदिराचे काम सांभाळत आहे.
देवस्थानाला तीन शतकांची परंपरा
आज सर्वत्र रामजन्म उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा होतो. पण हे राममंदिर २०० वर्षांपासून हा उत्सव साजरा करीत आहे. येथील प्रभु रामचंद्राची मूर्ती ही साक्षात असून याच आवारात हनुमंताची मूर्ती असून याचे दर्शन प्रथम होते. तिसऱ्या शतकात प्रवेशित झालेले हे देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
गिरड हे पर्यटन स्थळ आहे. भाविकांचे श्रद्धादान आहे. येथील दर्गाहवर हिंदु-मुस्लीम ऐक्याचा अनुभव येतो. राममंदिर प्राचीण इतिहासाची साक्ष देणारे आहे. या देवस्थानच्या विकासासोबत परिसराचे वैभव वाढविण्यास प्रशासन व विश्वस्त मंडळ मात्र उदासीन आहे.